Uncategorizedराष्ट्रीय
राज्यस्तरीय सैनिक महामेळावा; दीड हजार माजी सैनिकांची एकजूट
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तालुक्यातील करडे येथे रविवारी झालेल्या राज्यस्तरीय सैनिक महामेळाव्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतील सुमारे दीड हजार माजी सैनिक, कार्यरत सैनिक, वीरनारी, सैनिक कुटुंबीय आणि विविध सैनिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले.
माजी सैनिक किसान एकता शिखर संघ, महाराष्ट्र राज्य आणि भारतीय माजी सैनिक संस्था, शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात सैनिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
श्री भैरवनाथ मंगल कार्यालय येथे झालेल्या मेळाव्याची सुरुवात शहीद जवानांना मानवंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना सभागृहात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दीपक मनोहर ठोंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपसंचालक निवृत्त मेजर डॉ. शिल्पा मारोती खरपकर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके, निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे, डॉ. व्यंकटराव तेलंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अण्णा कदम यांनी प्रास्ताविकात संघटनेची स्थापना, उद्दिष्टे आणि भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. रोहिदास खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय भाषणात कर्नल दीपक मनोहर ठोंगे यांनी राज्यातील माजी सैनिक, वीरनारी आणि सैनिक कुटुंबीयांसाठी शासनामार्फत सुमारे ८० कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सवलती, मुलींच्या विवाहासाठी वाढीव अनुदान, कल्याणकारी निधी यांसह विविध योजनांचा लाभ जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर येथे माजी सैनिकांसाठी धर्मशाळा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे असून सैनिक कल्याण विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासनही
त्यांनी दिले. सैनिकांनी संघटितपणे लढा दिल्यास प्रश्न अधिक प्रभावीपणे सुटतील, असेही ते म्हणाले.
आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सवलती, मुलींच्या विवाहासाठी वाढीव अनुदान, कल्याणकारी निधी यांसह विविध योजनांचा लाभ जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर येथे माजी सैनिकांसाठी धर्मशाळा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे असून सैनिक कल्याण विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासनही
त्यांनी दिले. सैनिकांनी संघटितपणे लढा दिल्यास प्रश्न अधिक प्रभावीपणे सुटतील, असेही ते म्हणाले.मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिलेले सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई हे व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी पाठविलेल्या सदिच्छा संदेशातून सैनिकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले.

मेळाव्यात सैनिक संरक्षण कायदा तातडीने लागू करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत सैनिकांना राजकीय आरक्षण देणे, महसूल व फौजदारी प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, वीरनारी व शहीद कुटुंबीयांसाठी विशेष मदत केंद्र सुरू करणे तसेच सैनिक कुटुंबातील महिलांसाठी राज्यस्तरीय महिला ब्रिगेड स्थापन करणे, आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

राज्यातील २७ हून अधिक सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना मतभेद विसरून सैनिकांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पद नाही, कर्तृत्व मोठे” या घोषणेने सभागृह दुमदुमले.

कार्यक्रमाच्या शेवटी कोर कमिटीचे अध्यक्ष जगन्नाथ खामकर यांनी आभार मानले.. त्यानंतर स्नेहभोजनाने महामेळाव्याची सांगता झाली.




