Uncategorizedराष्ट्रीयविशेष

देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा पुढील वर्षापासून अधिक व्यापक स्वरूपात घेणार : नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होण्यासाठी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेसारखे उपक्रम कौतुकास्पद आहेत. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षापासून ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात घेण्यात येईल, अशी घोषणा शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केली.
शिरूर नगरपरिषद, डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर समर्थ सेवा मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर आणि अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा २०२६-२७ डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा पाचर्णे म्हणाल्या, “शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये क्रीडा, संगीत आणि चित्रकला शिक्षकांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व स्पर्धा आवश्यक आहेत. अशा उपक्रमांना नगरपरिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
स्पर्धेत सहभागी प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिरूर, द्वितीय क्रमांक डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर, तर तृतीय क्रमांक बालाजी सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर यांनी पटकावला. कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कारेगाव आणि आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत शिरूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १, ४ व ६ यांच्यासह सुपे येथील दिवटे पब्लिक स्कूल, गुरुकुल विद्यालय आणि तळेगाव येथील शाळेनेही सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक श्रीहरी मेहेंदरकर, नृत्यविशारद वर्षा पंडित आणि वृत्तनिवेदिका रेखा पुजारी-शेटे यांनी केले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ, डेक्कन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार, ओंकार संगीत विद्यालयाचे संस्थापक गणेश मराठे, समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी, अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष विलास आंबेकर, डेक्कन शाळेच्या पर्यवेक्षिका जयश्री दांडगे, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका डायना बोर्डे आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार, बालाजी स्कूलचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक नीरज राय, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य नाना पोटे, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, जयश्री दांडगे, डायना बोर्डे आदींच्या उपस्थितीत झाले.
सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह, तर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल ढवळे यांनी केले. आभार विलास आंबेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button