Uncategorized

रानभाज्या व भरडधान्य महोत्सवातून पारंपरिक आहारसंस्कृतीचा जागर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, पारंपरिक आहारसंस्कृतीचे जतन आणि रानभाज्या, भरडधान्ये व गावरान कडधान्यांचे पोषणमूल्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “रानभाज्या व भरडधान्य महोत्सव–२०२६” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव, विज्ञान शाखा व वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. एम. घनगावकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी रानभाज्या, भरडधान्ये व गावरान कडधान्ये ही भारतीय आहारसंस्कृतीचा अमूल्य वारसा असल्याचे सांगून, त्यांचे संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन, संशोधनवृत्ती आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा संगम अशा उपक्रमांतून साध्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात महोत्सवामागील भूमिका स्पष्ट करत रानभाज्या, भरडधान्ये व गावरान कडधान्यांचे संवर्धन, त्यांचे पोषणमूल्य समाजापर्यंत पोहोचविणे, स्थानिक जैवविविधतेबाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.महोत्सवात ९२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ६१ प्रकारच्या रानभाज्या तसेच ३० प्रकारच्या भरडधान्ये व गावरान कडधान्यांचे आकर्षक प्रदर्शन सादर केले. प्रदर्शनामध्ये आंबोशी, चाकवत, अंबाडी, रानभेंडी, कर्टुलं, सराटा, मटारु, पाथरी, चिवळ, घोळ, वाघाटे, शिंदाडमाकड, खडकशेपू, आघाडा, माठ, आंबट चुका, कुंजीर, तांदूळजा, कुरडू, हदगा, अळंबी, केना, अळू, गुळवेल, टाकळा आदी विविध रानभाज्यांचा समावेश होता. तसेच भगर, वरई, राळ, नाचणी, सावा, राजगिरा, बाजरी, ज्वारी, मूग, मटकी, उडीद, चवळी, वाटाणा, हरभरा आदी भरडधान्ये व गावरान कडधान्यांचेही प्रदर्शन मांडण्यात आले.याशिवाय रानभाज्या व भरडधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक, स्वादिष्ट आणि पारंपरिक पाककृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व नागरिकांनी विविध रानभाज्या, भरडधान्ये आणि गावरान कडधान्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेत या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एन. एम. घनगावकर यांनी केले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विकास नाईकवाडी, प्रा. अशोक चौधरी, डॉ. संदीप देवकर, डॉ. हर्षद शिर्के, प्रा. दिपाली पवार, प्रा. शारदा थोरात, प्रा. प्रशांत माने, प्रा. अभिजित घावटे, प्रा. मीरा शिंदे,  केतन हिंगे,  दुर्गेश बारस्कर, डॉ. अशोक काकडे, डॉ. मंजुषा पाटील, प्रा. विलास निश्चित, प्रा. विजयकुमार सूर्यवंशी, प्रा. प्रियदर्शनी लाटे, प्रा. सुनील नरोटे तसेच संशोधक आणि पदवी (UG) विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button