Uncategorized

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषात आणि देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात शिरूर शहरात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व वयाची शताब्दी पूर्ण केलेले हरिभाऊ पानसरे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व वयाची शताब्दी पूर्ण केलेले हरिभाऊ पानसरे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषात आणि देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात शिरूर शहरात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेऱ्यांमुळे शहरात सकाळपासूनच देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके, नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गीरगोसावी, नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, सुवर्णा खरमाटे, पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने आदी उपस्थित होते.

बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रशांत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, मिलिंद भोसुरे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे आदी उपस्थित होते.

शिरूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत स्थलांतरानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. पोलीस उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस ठाण्याच्या इमारतीवर तिरंगी रंगांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. देशभक्तीपर गीते आणि रांगोळ्यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.

शिरूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याधिकारी प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष मितेश दादिया, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक तथा सहाय्यक निबंधक (सहकार) हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रभारी सचिव अनिल ढोकले यांच्यासह बाजार समितीतील कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

हलवाई चौक गणेश मित्र मंडळ येथे सुरेखा रमाकांत बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपस्थित होते.

शतकपूर्ती करणाऱ्या पानसरे यांचा विशेष सन्मान

व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक हरिभाऊ पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केलेल्या पानसरे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि जन्मशताब्दीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा व सुवालाल पोखरणा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, अरुण पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे आदी उपस्थित होते.

यावेळी हरिभाऊ पानसरे यांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी, “विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाची कास धरावी. आळस हा आपला वैरी आहे,” असे सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले असून विद्यार्थ्यांनी भरपूर खेळून आरोग्य चांगले ठेवावे आणि विविध क्षेत्रांत करिअर करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिरूर पंचायत समितीत सभापती स्वाती घावटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. गटविकास अधिकारी महेश डोके उपस्थित होते.

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात महाविद्यालयीन नियामक मंडळाचे सदस्य कुमारपाल बोरा यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. संस्थेचे सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते आदी उपस्थित होते.

डेक्कन स्कूल शिरूर येथे माजी सैनिक ज्ञानदेव देवखिळे, माजी सुभेदार अशोक वाळुंज आणि माजी सैनिक साहेबराव जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. बीड येथील अपर जिल्हाधिकारी मिनिनाथ दंडवते, प्राचार्य डॉ. समीर ओंकार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परेड, समूहगीत, भरतनाट्यम आदी कला आविष्कार सादर केले.

रयत शाळेत माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.

ज्ञानगंगा विश्व विद्यालय व ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथे अनुक्रमे कॅप्टन वसंतराव कटके आणि कॅप्टन शिवाजीराव वराळ यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेराम घावटे, माजी प्राचार्य डॉ. गोविंदराव निंबाळकर आदी उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषदेच्या सेंटर शाळा उर्दू शाळेत उपनगरध्यक्ष मितेश गादिया यांनी ध्वजारोहन केले.हुतात्मा स्मारकावर परवीन शेख यांच्या हस्ते तर जीवन विकास मंदिर येथे दिलिप शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक आदी यावेळी उपस्थित होते. बीकेसी हायस्कुल येथे बांधकाम व्यवसायिक संदीप बिहानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ चौधरी,मनीषा चौधरी आणि उपस्थित होते

विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांमध्ये झालेल्या ध्वजारोहणामुळे शिरूर शहरात दिवसभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button