विशेष
शिरूर बायपासवरील अपघातांचे सत्र थांबेना; पुन्हा अपघात पुन्हा तरुणाचा मृत्यू

शिरूर बायपासवरील धोकादायक क्रॉसिंग बंद केल्यानंतर बाबुरावनगरकडे जाणाऱ्या अनेक वाहनांनी सी. टी. बोरा महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलाखालून जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून अनेक वेळा कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाच्या नगर बाजूला असलेल्या दुभाजकाचा काही भाग फोडलेला आहे. या फोडलेल्या दुभाजकातून अनेक दुचाकीस्वार थेट रस्ता ओलांडून बाबुरावनगरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. पुणे तसेच अहिल्यानगरकडून वेगाने येणारी वाहने आणि अचानक रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी यामुळे हा परिसर अपघाताचा संभाव्य ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.
विशेष म्हणजे, अपघाताची घटना घडल्यानंतरही अनेक दुचाकीस्वार याच धोकादायक मार्गातून बिनधास्तपणे रस्ता ओलांडताना दिसून आले. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. 
गेल्या आठवड्यात बायपासवरील अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणी पक्के दुभाजक बसविण्यात आले. तसेच तब्बल ३८ बॅरिगेट्स लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, सी. टी. बोरा महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलाच्या नगरच्या दिशेने असलेला दुभाजक फोडलेल्या असतानाही त्याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे दिसत आहे.
नागरिकांच्या नजरेस सहजपणे येणारा हा धोकादायक मार्ग प्रशासनाच्या नजरेस का येत नाही. अथवा तो दिसूनही दुर्लक्षित करण्यात आला का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बायपासवरील धोकादायक क्रॉसिंगला बंदिस्त करून वाहतूक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी त्याचा वाहतुकीवरील परिणाम दुसऱ्या मार्गावर जाणवत आहे. त्यामुळे केवळ क्रॉसिंग बंद करण्याऐवजी शिरूर बायपासवरील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
फोडलेला दुभाजक तातडीने बुजविणे, त्या ठिकाणी मजबूत बॅरिगेट्स बसविणे आणि अनधिकृतपणे रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे. आणखी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने संभाव्य अपघातस्थळांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


