Uncategorized
संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व; माजी सहाय्यक आयुक्त साहेबराव देशमुख यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: सेवानिवृत्त शासकीय अधिकारी तथा माजी सहाय्यक आयुक्त साहेबराव देशमुख यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या हस्ते देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना साहेबराव देशमुख यांनी संघर्षमय परिस्थितीतून आपले जीवन घडविले असल्याचे सांगितले. शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची त्यांची कार्यशैली आहे.



वरून कडक स्वभावाचे वाटत असले तरी मनाने ते अत्यंत हळवे आणि मृदू आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे व सेवाभावनेने काम केले. कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांचे करिअर घडविण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सत्काराला उत्तर देताना साहेबराव देशमुख म्हणाले, “मला घडविण्याचे काम माझे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव देशमुख यांनी केले. ३४ वर्षांच्या शासकीय सेवेत राज्यभर विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. या प्रदीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणे काम केले असून आजवरचे आयुष्य पूर्ण समाधानी आणि समृद्धपणे जगलो आहे.”
यावेळी माजी मुख्याध्यापक दिलिप देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती नोटरी देवराम धुमाळ डॉ. संदीप औटी, ह. भ. प. भाऊसाहेब गट, रामदास देशमुख, लगड सर यांनी मनोगत व्यक्त करून साहेबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमात साहेबराव देशमुख यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफीत सादर करण्यात आली. त्यातून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि शासकीय सेवेतील योगदानाचा उपस्थितांना परिचय झाला.
-
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी तर आभार आनंद देशमुख यांनी मानले.लोकजागृती संघटनेच्या वतीने माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी सत्कार केला

