पाईप चोरी प्रकरणात बदनामी व धमक्यांविरोधात फौजदारी कारवाईचा इशारा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपालिका हद्दीतील सी.टी.एस. क्रमांक १९२०/१ या मिळकतीमध्ये असलेल्या जुन्या व कुजलेल्या पाईपलाईनच्या पाईप चोरीप्रकरणी व्यापारी तथा बांधकाम व्यावसायिक महेंद्र धरमचंद फुलफगर यांचा कोणताही संबंध नसताना, काही व्यक्ती गैरहेतूने त्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच खोट्या बातम्या व व्हिडीओ प्रसारित करून बदनामी तसेच धमक्या दिल्या जात असल्याने संबंधितांविरुद्ध योग्य ती फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अॅड. पंकज भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस धरमचंद फुलफगर, बांधकाम व्यावसायिक महेंद्र फुलफगर आदी उपस्थित होते.
अॅड. भंडारी यांनी सांगितले की, सी.टी.एस. क्रमांक १९२०/१ ही मिळकत महेंद्र फुलफगर यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केली आहे. त्यापूर्वी या मिळकतीचे मूळ मालक बोरा यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी शिरूर नगरपरिषदेकडे बंद पडलेल्या पाईपलाईनचे पाईप काढण्याबाबत अर्ज केला होता.
मिळकत खरेदी केल्यानंतर महेंद्र फुलफगर यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी तसेच त्यानंतर अनेक वेळा शिरूर नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागाकडे बंद पडलेल्या पाईपलाईनचे पाईप काढून घेण्याबाबत विनंती केली. याबाबत व्हॉट्सअॅपद्वारेही नगरपरिषदेला वारंवार कळविण्यात आले होते.
नगरपरिषदेकडून मिळालेल्या सूचनेनुसार, सदर पाईपलाईनमधील खराब व कुजलेले लोखंडी (बिडाचे) चार ते पाच पाईप काढून शिरूर नगरपरिषदेच्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आले होते. याबाबत नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागालाही माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हे पाईप चोरीस गेल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी नगरपरिषदेकडून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे अॅड. भंडारी यांनी स्पष्ट केले.
“पाईप चोरीच्या घटनेशी फुलफगर यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खोट्या बातम्या, खोटे व्हिडीओ प्रसारित करून तसेच धमक्या देऊन मानसिक त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,” असे अॅड. भंडारी यांनी सांगितले.