पुणे जिल्हा

शिक्षणासाठी वयाची अट नाही, इच्छाशक्ती महत्त्वाची”

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी बोरा कॉलेज मध्ये प्रेरणादायी कार्यक्रम;

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} : शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते; केवळ शिकण्याची इच्छाशक्ती, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करून संशोधनाकडे वळावे आणि शिक्षणाचा आनंद घेत आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ म के. सी. मोहिते यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यासकेंद्र, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मोहिते म्हणाले की मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुक्त विद्यापीठाच्या जडणघडणीत माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणामध्ये अधिक लवचिकता आली असून विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणे काळाची गरज असल्याचेही मोहिते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. डॉ. अंबादास केत यांनी केले. देशात सुमारे २० मुक्त विद्यापीठे असून एक राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात १ जुलै १९८९ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सुरुवात झाली. पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि मुक्त विद्यापीठाची शिक्षण प्रणाली यामध्ये काही फरक असून, मुक्त विद्यापीठामुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मंदा काणे, प्रा. अलका बेलोटे, प्रा. बेळे, केंद्र सहाय्यक निळोबा भोगावडे, प्रा. पाडळकर, प्रा. दीपक बनकर, प्रा. आप्पासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर आभार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button