पाईपलाईन चोरीप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी;

शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या बंद पडलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईन चोरीप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विशाल जोगदंड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे..
नगरपरिषदेच्या जुन्या पाईपलाईन चोरीच्या प्रकरणात जोगदंड यांनी यापूर्वीही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांना बदनामीची नोटीस पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जोगदंड म्हणाले, “या प्रकरणात आपण कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. नगरपालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारातून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, एवढीच आपली मागणी आहे. आपण कोणाचीही बदनामी केलेली नाही.”
दरम्यान, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बंद पडलेली पाईपलाईन काढली होती.
काढलेली पाईपलाईन नगरपरिषदेच्या ताब्यात न देता सरकारी जागेवर ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्या सरकारी जागेतून अज्ञात चोरट्यांनी पाईपलाईन चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.
पाईपलाईन चोरीप्रकरणी दोषी कोण, याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, सध्या पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.