शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूरचे सुपुत्र तथा २००८ बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी अमित फक्कडराव घावटे यांनी दिल्ली येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) परिषदेत आंतरराष्ट्रीय फरारी गुन्हेगारांच्या हद्दपारी या विषयावर सत्र घेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत सलग दुसऱ्या वर्षी त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
अमित घावटे हे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), मुंबई येथे अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. गुप्तचर व आर्थिक तपास क्षेत्रातील त्यांना १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी DGCEI, SIIB, CGST आणि SFIO यांसारख्या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२२ मध्ये NCB महासंचालक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
दिल्लीतील या राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृह सचिव, तसेच विविध राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित होते. अशा राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर अमित घावटे यांनी आंतरराष्ट्रीय फरारी गुन्हेगारांच्या हद्दपारीसंदर्भातील विषयावर मार्गदर्शन केल्याने शिरूरच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अमित घावटे हे शिरूरच्या दिवंगत माजी उपनगराध्यक्षा सुमनताई घावटे आणि डॉ. फक्कडराव घावटे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर नगरपालिकेच्या सेंटर शाळेत, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशालेत झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय महसूल सेवेत दाखल झाले.
शिरूरच्या मातीतून घडलेल्या अमित घावटे यांच्या राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मित्र, स्नेही, नागरिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.