गुन्हेगारी

39 वर्षे कामगाराचा गोळी झाडून खून

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरात पाणी प्रक्रिया प्लॅंटमध्ये काम करणाऱ्या ३९ वर्षीय कामगाराचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. हमजा उस्मान शेख (वय ३९, रा. करेगाव साईनगर, ता. शिरूर, मूळ रा. धामोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत त्यांच्या पत्नी अबिताबी हमजा शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजा शेख हे साईनगर येथील विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या पाणी प्रक्रिया प्लॅंटमध्ये काम करीत होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घरी होते. मंगळवारी सकाळी सव्वासहा ते पावणेसातच्या दरम्यान ते कामासाठी प्लॅंटमध्ये गेले होते.

सकाळी साडेसहाच्या सुमारास प्लॅंटजवळील एकाने अबिताबी शेख यांना, “तुमचे पती पाणी प्लॅंटमध्ये पडले असून त्यांच्या डोक्यातून रक्त येत आहे,” असे सांगितले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता हमजा शेख हे गंभीर अवस्थेत पडलेले दिसून आले.त्यानंतर त्यांना शिरूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता हमजा शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह पुणे येथे पाठविण्यात आला. पोलिस तपासादरम्यान पाणी प्लॅंट परिसराची पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले पोलीस निरीक्षक कुमार कदम आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अज्ञात व्यक्तीने कोणत्या कारणातून हमजा शेख यांच्यावर गोळी झाडली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
हमजा शेख यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.त्याच्या स्वभाव अत्यंत शांत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button