ना कलाक्षेत्राचा वारसा, ना गॉडफादरचा आधार; जिद्द, मेहनत आणि अभिनयावरील निष्ठेच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी शिरूरची कन्या प्रतीक्षा संजय बारवकर आज नवोदित अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मुलींनीही स्वप्नांना मर्यादा घालू नयेत, तर स्वतःच्या कलागुणांवर विश्वास ठेवून संधींचे सोने करावे, याचे प्रतीक्षा हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
कुटुंबाची साथ, स्वप्नांना नवी दिशा
शिरूरसारख्या ग्रामीण भागातून मनोरंजनविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करणे हे सोपे आव्हान नाही. प्रतीक्षाच्या कुटुंबात अभिनयाचा पारंपरिक वारसा नसला, तरी वडील संजय बारवकर यांना सूत्रसंचालन आणि निवेदन क्षेत्रातील अनुभव व ओळख आहे. आई उर्मिला आणि वडील संजयव यांनी प्रतीक्षाच्या कलागुणांवर विश्वास ठेवत तिला आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.
“तुला जे आवडते, ते मनापासून कर. ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रात काम कर,” हा आई-वडिलांचा विश्वास प्रतीक्षासाठी मोठी ताकद ठरला. विशेषतः अभिनयासारख्या अनिश्चितता आणि स्पर्धा असलेल्या क्षेत्रात काम करताना कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. प्रतीक्षाच्या वाटचालीत हीच साथ तिच्या आत्मविश्वासाचा आधार बनली.
प्रशिक्षणातून अभिनयाचा पाया मजबूत
अभिनय क्षेत्रात व्यावसायिक वाटचाल करण्यासाठी प्रतीक्षाने २०१७-१८ मध्ये प्रशांत दामले यांच्या फाउंडेशन ट्रेनिंग स्कूलमधून अभिनय आणि नृत्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने जाहिरात क्षेत्र, चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमांत काम करण्यास सुरुवात केली.
या प्रवासात स्वतःला सिद्ध करण्याची, नव्या संधी शोधण्याची आणि प्रत्येक भूमिकेतून शिकण्याची तयारी तिने ठेवली. सुरुवातीच्या काळात संधी मिळवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, केवळ संधीची वाट पाहण्याऐवजी स्वतःच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न तिने केला.
स्वतःच्या गाण्याच्या निर्मितीतून पहिली झेप
प्रतीक्षातील अभिनयगुणांना वाव मिळावा, यासाठी तिचे आई-वडील संजय आणि उर्मिला बारवकर यांनी स्वतःच्या खर्चातून ‘तुझ्या इश्काच सपान पडतंय गं’ या यूट्यूब गाण्याची निर्मिती केली. मुलीच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी व नातेवाईक यांनी घेतलेला हा पुढाकार तिच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
त्यानंतर प्रतीक्षाला ‘टीडीएम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तसेच हैदराबाद कस्टडी’ चित्रपटात तिने भूमिका साकारली. ‘हाऊसफुल’ या व्यावसायिक नाटकातही तिने काम केले असून या नाटकाचे आठ प्रयोग झाले आहेत. याशिवाय जाहिराती, दोन लघुपट आणि चेन्नई येथे दक्षिण भारतीय चित्रपटातील भूमिकेचाही तिच्या अनुभवात समावेश आहे.
एस. पी. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होत तिने कलेशी असलेले नाते अधिक दृढ केले.
नवनव्या संधींच्या शोधात
प्रतीक्षाची अभिनयातील वाटचाल अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असली, तरी तिची स्वप्ने मोठी आहेत. सध्या ती पॉडकास्ट, लघुपट आणि आगामी चित्रपटांसह विविध प्रकल्पांवर काम करण्याच्या तयारीत आहे. या क्षेत्रात सातत्याने अद्ययावत राहणे, नव्या गोष्टी शिकणे, संपर्क वाढवणे आणि प्रत्येक संधीचे महत्त्व ओळखणे आवश्यक असल्याची जाणीव तिला आहे.
मनोरंजनविश्वात केवळ प्रतिभा असून चालत नाही; त्यासोबत संयम, मेहनत, व्यावसायिक शिस्त आणि सातत्यही आवश्यक असते. या जाणिवेतून प्रतीक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
ग्रामीण भागातील तरुणाईसाठी प्रेरणादायी संदेश
ग्रामीण भागात अनेक मुला-मुलींकडे अभिनय, गायन, नृत्य आणि इतर कलांचे उपजत गुण असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, व्यासपीठ आणि संधींच्या अभावामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. अशा तरुणांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, वाचनाची आवड जोपासावी, विषयांचा सखोल अभ्यास करावा आणि आपल्या कामाशी शंभर टक्के प्रामाणिक राहावे, असे प्रतीक्षाला वाटते.
तसेच पालकांनी मुलांच्या आवडीचा आदर करून त्यांना योग्य क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असेही ती सांगते. ग्रामीण पार्श्वभूमी, चित्रपटसृष्टीतील ओळखींचा अभाव किंवा गॉडफादर नसणे ही यशाच्या वाटेतील अंतिम बंधने नाहीत. जिद्द, कौशल्य आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर स्वतःची वाट निर्माण करता येते, हा तिच्या प्रवासाचा संदेश आहे.
मुख्य नायिका होण्याचे स्वप्न
अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करताना प्रतीक्षासमोरही अनेक अडचणी होत्या. मात्र, अभिनयाविषयीची आवड आणि मेहनत करण्याची तयारी यांच्या बळावर तिने या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. अद्याप बराच मोठा प्रवास बाकी असल्याची जाणीव ठेवून ती प्रत्येक अनुभवातून शिकत आहे.
भविष्यात चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारण्याचे तिचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या दिशेने ती आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
नवरात्रीतील नवदुर्गा विशेष मालिकेत प्रतीक्षा बारवकरचा प्रवास ही केवळ एका नवोदित अभिनेत्रीची कहाणी नाही, तर आपल्या आवडीवर विश्वास ठेवणाऱ्या, कुटुंबाच्या पाठबळातून स्वप्नांना बळ देणाऱ्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नव्या पिढीतील मुलींच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. तिच्या अभिनयप्रवासाला यशाची नवी उंची लाभो, हीच सदिच्छा!