
गंगा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ . प्रा . राजेराम प्रभू घावटे यांच्या मातोश्री गंगुबाई प्रभू घावटे यांचे नुकतेच निधन झाले . शुक्रवार दिनांक २० जून रोजी २०२५ रोजी भैरवनाथ मंदिर तर्डोबाची वाडी येथे दशक्रिया विधी आहे.
अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीवर मात करत व्यवसाय, उद्योग , शिक्षण समाजकारण यात वेगळी ओळख निर्माण करणारे, कोण्यावर ही टीका टिपण्णी न करता आपल्या प्रगतीचा मार्ग निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. राजेराम घावटे या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या म्हणजे मातोश्री गंगुबाई घावटे .
आपण जे काही आहोत ते फक्त आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांच्या व मातोश्री गंगुबाई यांनी दिलेल्या दिलेल्या शिकवणूकीच्या व मार्गदर्शनाच्या बळावर आहे. याची जाणीव प्रा. डॉ. राजेराम घावटे यांना सातत्याने असल्याने त्यांनी आपल्या सर्व व्यवसायांना आपल्या आईचे नाव देऊन आई विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पेट्रोल व्यवसाय,बांधकाम व्यवसाय, शिक्षण संस्था या सर्व ठिकाणी आपल्या आईचे नाव त्यांनी दिले.आपण कष्ट व प्रामाणिकपणे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले पण माझ्या कष्ट आणि प्रामाणिकपणा बरोबरच माझ्या आईचं नाव माझ्या सर्व व्यवसायला असल्याने सर्व व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे करता आल्याची भावना प्रा. डॉ .राजेराम घावटे व्यक्त करतात.
आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या व आपले जीवन जीवन घडवणाऱ्या या मातेची आजारपणात घावटे परिवाराने सेवा केली. आपली आई या आजारपणातून बाहेर पडावी याकरिता प्रा. राजेराम घावटे यांनी अथक प्रयत्न केले.परंतु निसर्गापुढे आपण सर्वजण हतबल आहे.कोणत्याही संकटांना अडचणींना धैर्याने व संयमाने सामोरे जाणाऱ्या जाणा-यां प्रा. राजेराम घावटे यांचा मातृवियोगाने अश्रूंचा बांध फुटला.आपली आई गेली याचे मोठे दुःख त्यांना झाले.”आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. तिचा आशीर्वाद पाठीशी असेल, तर वाट कितीही काटेरी असली तरी यश फुलतंच.” हे घावटे परिवाराकडे पाहिले की आपल्याला समजून येते.
शिरूर (रामलिंग) येथील दसगुडे कुटुंबातून कोहकडी (ता. पारनेर) येथे घावटे कुटुंबात आलेल्या मातोश्री गंगुबाई प्रभू घावटे यांचा जीवनप्रवास कष्ट त्याग व सेवाभाव यांची साक्ष देतो.
व्यक्तिगत जीवनात अनंत अडचणी, दुःख कष्ट उपसत यशाचा राजमार्ग त्यांनी तयार केला. शिक्षणामुळे बदल होतो आपल्या जीवनाला वेगळी उंची गाठता येते याची जाणीव मातोश्री मातोश्री गंगुबाई घावटे यांना होती. त्यामुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे ही तळमळ त्यांना होती. परिस्थिती गरिबीची जरी होती तरी प्रा. राजेराम घावटे यांना उच्च शिक्षणाकरिता त्यांनी पुणे येथे पाठवले बी. एस्सी.ॲग्रीचे शिक्षण आपल्या मुलाला त्यांनी दिले.
अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत पतीसोबत खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या गंगुबाईनी शेतमजुरी सह कुकडी कॅनॉलवरील मजुरी करत काळाच्या छाताडावर पाय रोवत आपल कुटुंब सावरल व आपल्या मुलांचे आयुष्य घडवलं.
परिस्थिती बिकट व गरिबीची असली तरी रडायच नाही तर लढायच . कोणतेही कष्टाच व मेहनतीचे काम करायला लाजायच नाही . हताश व निराश व्हायच नाही . सतत कामात गुंतुन राहायच व उद्योगी राहायच . कोण काय म्हणत याचा विचार न करता आपणास जे योग्य वाटत ते करत राहयच, संघर्ष करायचा प्रतिकूल परिस्थिती आपणांस संपविण्यासाठी नाही तर आपल्यातील क्षमता कौशल्य अजमावयाला असून यावर धैर्याने मात करायची. धैर्य व सयंम सोडायचा नाही .
परिस्थितीशी दोन हात करायच आणि पुढे चालायच हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र मातोश्री गंगूबाई घावटे यांनी बनविला .
धैर्य , धाडस व सयंम यांचे संस्कार स्वंत :च्या जीवनात आचरणात आणून मातोश्री गंगूबाई यांनी हे संस्कार आपल्या मुलांच्या ही अंगी बिंबवले .
याची प्रचिती प्रा . राजेराम घावटे यांच्या यशोगाथे कडे पाहिले की येते . घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही कृषी क्षेत्रात उच्च पदवीधर होणे त्यानंतर शिक्षक होणे व अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त करून डॉक्टर पदवी मिळवणे. बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक, पेट्रोल पंप व्यावसायिक, खाजगी साखर कारखानदार , जीम व्यवसाय त्याचबरोबर विविध उद्योग व्यवसाय याची निर्मिती पाठीमागे धाडस ,संयम व धैर्य दिसते .या सर्वांची पेरणी सरांमध्ये या मातेने केली. घावटे सरांच्या ज्ञानगंगा स्कूलचे ब्रीदही” धैर्यम सर्वत्र पूजते ” हे आहे. याचीही प्रेरणा मातोश्री गंगुबाई यांच्याच विचारांची आहे. सरांच्या जीवनप्रवासात मातोश्री गंगुबाई यांच्या मार्गदर्शना बरोबरच लोकनेते आमदार बाबूरावजी काशिनाथ पाचर्णे , उद्योगपती व माजी नगराध्यक्ष रसिकलालजी धारीवाल , माजी नगराध्यक्ष किसनदास बरमेचा , माजी नगरसेवक चंद्रकांत बाफना यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना मिळाले .
कष्ट करत प्रभू घावटे व मातोश्री गंगुबाई घावटे यांनी राळेगणसिद्धी ,कोहकडी अश्या विविध ठिकाणी काम केले. पुढे आपल्या कामानिमित्त त्या शिरूर शहरात आल्या. शहरात आल्या तरी कष्ट त्यांना काही चुकले नाही .शिरुरला कष्टाच्या जोरावर त्यांनी आपले जीवन घडविण्यास सुरुवात केली. शिरूर शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात त्यांनी किराणा व्यवसायाची सुरुवात केली. दरम्यानच्या काळात सन 1996 मध्ये घावटे परिवारातील ज्येष्ठ चिरंजीव बाजीराव यांचे अकस्मात निधन झाले .मातोश्री घावटे व त्यांच्या सर्व कुटुंबांना हा मोठा धक्का होता.
सयंम ,धाडस याच बरोबर आदर , जिव्हाळा , सामाजिक बांधिलकी , गरिबांविषयी कणव , मैत्र , नातेसंबध जपणे , इतरांच्या सुख दु:खात सहभागी होणे , इतरांच्या अडचणीचा प्रसंगी मदतीसाठी पुढे येणे असे असंख्य गुण या माते मध्ये होते . हे गुण व संस्कार प्रा. राजेराम घावटे व त्यांच्या भाऊ व बहिणी मध्ये आले आहेत . सरांचे चिरंजीव प्रसाद यांनी ही परदेशात जावून उच्च शिक्षण घेत उद्योग क्षेत्रात प्रवेश केला आहे . साखर , इथेनॉल व खते या उद्योगात ते कार्यरत आहेत तर कन्या अमृतेश्वरी या ज्ञानगंगा या शैक्षणिक संकुलाचे काम पाहण्याबरोबरच पीएचडीचे शिक्षण ही पूर्ण करीत आहेत .
शिक्षण , व्यवसाय , नोकरी , उद्योग अर्थकारण व समाजकारण यांच्या निमित्ताने अनेकांशी सरांचे मैत्र जमले ते कायमचे . जिव्हाळा ,मैत्री निभावणे , सामाजिक बांधिलकी या मातेच्या गुणांचा अंगीकार करत सरांनी जगभर मैत्रीची जाळे उभारले आहे . हे मैत्र म्हणजे सरांची सपोर्ट सिस्टीम असून ही मैत्रीची श्रीमंती त्यांची दिवसेदिवस वृध्दिगत होत आहे . मातोश्री गंगुबाई यांचे निधनाचे वृत्त समजल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , सनदी आधिकारी कान्होराज बगाटे , सयुंक्त राष्ट्रसंघात काम केलेले सनदी आधिकारी डॉ . शिरीष रावण, उपायुक्त मिनीनाथ दंडवते ,पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले , महाराष्ट्र राज्य प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम, माजी नगराध्यक्ष गुलाबशेठ धाडीवाल ,जाकिरखान शहिदखान पठाण यांच्यासह अनेक शासकिय आधिकारी , राजकिय ,सामाजिक , शैक्षणिक , बांधकाम , साखर कारखानदारी व पेट्रोल पंप व्यवसायिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घावटे कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले .
मातोश्री गंगुबाई प्रभू घावटे यांचा जीवनप्रवास म्हणजे अथक कष्ट ,सेवा ,
करुणा कणव व दातृत्वाचा असा आहे .
आपल्या कार्यातून कष्टातून एक वेगळे विश्व या मातेने उभारुन मातृशक्ती काय करु शकते हे समाजाला दाखवून दिले आहे .
आपल्या आई विषयीच्या कृतज्ञतेपोटी व मातृशक्तीचा गौरव करण्यासाठी प्रा. राजेराम घावटे मातोश्री गंगुबाई घावटे यांचे यथोचित स्मारक उभारणार आहेत . मातोश्रीच्या दिव्य व तेजस्वी स्मृतीस विनम्र अभिवादन
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो, आणि कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगात धैर्य देवो.