महाराष्ट्रविशेष
शिरूर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई बुलेट सायलेंसर, काळी काच व बेकायदेशीर स्टिकर असलेल्या वाहनांवर कारवाई

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरूर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेने शहरातील बेकायदेशीर वाहनधारकांवर मोठी कारवाई करत ३५ बुलेट मोटारसायकलींचे कर्कश आवाज करणारे सायलेंसर जप्त करून त्यांचा बुलडोझरद्वारे नाश केला.
.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे व पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम यांनी ही कारवाई केली. कॉलेज परिसर, शाळा, बस स्टॅण्ड व गर्दीच्या ठिकाणी धडक मोहीम राबवून बुलेटच्या सायलेंसरमधून फटाके फोडणारे व कर्कश आवाज करणाऱ्या ३५ बुलेट मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
तसेच, २८ जुलै रोजी महींद्रा थार (क्र. एमएच १२ वायडी ३८४८) या वाहनावर लावलेले “महाराष्ट्र विधानसभा सदस्य” आमदारांचे स्टिकर व १ ऑगस्ट रोजी टोयोटा फॉर्च्यूनर (क्र. एमएच ४३ बीएन ४५४५) या वाहनावर लावलेले “लोकसभा सदस्य खासदार” स्टिकर काढून टाकण्यात आले. संबंधित वाहनांवर MMVR १३४(१)/१७७ प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, शहर व ग्रामीण भागातील काळ्या काचांचे फिल्मींग असलेल्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करून जागेवरच फिल्मींग फाडण्यात आले.
खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांची नावे नमूद केल्याचे आढळल्यास त्यावरही वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक केंजळे यांनी इशारा दिला आहे की, माननीय खासदार, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींव्यतिरिक्त कोणीही त्यांच्या खाजगी वाहनांवर लोकप्रतिनिधींची चिन्हे अथवा स्टिकर लावल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.