
शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम-24) शिरूर शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी डेक्कन स्कूल च्या पुढाकाराने विज्ञान मंडळाची सुरुवात आचार्य प्रफुल्ल चंद्र राय यांच्या जन्मजयंती च्या निमित्ताने करण्यात आली आहे.
या वेळी ज्येष्ठ संशोधक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.के. सी. मोहिते यांनी शिरूर मधील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाची सुरुवातीस आचार्य प्रफुल्ल चंद्र राय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. मोहिते यांनी अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे व शोधाचे रंजक किस्से सांगून विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण केले. मुलांनीही उत्स्फूर्तपणे विज्ञान विषयक अनेक प्रश्न विचारले. मुलांनी सतत स्वतःला प्रश्न विचारत राहिले पाहिजे व भरपूर वाचन केले पाहिजे असे डॉ. मोहिते यांनी नमूद केले.
डेक्कन स्कूल चे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी विज्ञान मंडळाच्या स्थापनेची मागची भूमिका विषद केली. विज्ञान मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला विज्ञानावर आधारित एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून
या मध्ये शास्त्रज्ञांशी हितगुज, विज्ञान कथा वाचन, सायन्स फिल्म फेस्टिवल, प्रयोगातून विज्ञान असे विविध उपक्रम सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.
शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुधाकर पोटे व व्ही डी कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी
पोदार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य नीरज राय, बालाजी विश्वविद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे, गणेश मराठे, शिक्षक प्रतिनिधी जयश्री दांडगे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महादेव भाटकर, सहसचिव किशोरी लगड आदी उपस्थित होते. सोनाली लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. कोमल सुतार यांनी आभार मानले. लहू धारजे, रूपाली चंडालिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आचार्य प्रफुल्ल चंद्र राय यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.