Uncategorized

रानभाज्या व भरड धान्य हे आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी आवश्यक

रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५ व बीज राखी प्रदर्शन

शिरूर ( डेली न्यूज  पोस्ट टीम-२४)
रानभाज्या व भरड धान्य हे आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी काळाची गरज असल्याचे मत राज्य प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष तथा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेला “रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२५” व बीज राखी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याचे उदघाट्न नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य हरिदास जाधव होते.
यावेळी बोलताना निकम म्हणाले की, “रानभाज्या व भरड धान्य हे आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी काळाची गरज आहे. या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे व त्यांचा आहारात समावेश करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
विज्ञानशाखा प्रमुख डॉ. नारायण घनगावकर यांनी रानभाज्या व धान्य संवर्धनाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले.
महोत्सवाचे प्रास्ताविक समन्वयीका डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाने दिलेल्या रानभाज्या व भरड धान्य विषयी जनजागृती, संवर्धन व्हावे. आहारात त्यांचे महत्त्व काय आहे याची माहिती व्हावी यासाठी महोत्सवाचे आयोजन केले गेले . तसेच रानभाज्यां व भरड धान्य विषयी ज्ञान एका पिढीकडून पुढील पिढीकडे जाणे गरजेचे आहे.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तब्बल ६३ प्रकारच्या रानभाज्या व भरड धान्यांचे फलक, माहिती व पाककृती सादर केल्या. यात फांद भाजी, टाकळा, सराटा, बांबू, वाघाटे, आळू, अंबाडी, सुरण, शेवगा, भुईआवळा अशा रानभाज्यांचा समावेश होता. तर नाचणी, राळा, ज्वारी, बाजरी, सावा, राजगिरा, भगर यांसारख्या धान्यांवर आधारित माहिती व उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रानभाज्यांच्या पाककृती व भरडधान्यावर आधारित खाद्यपदार्थांनी सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे वनस्पतीशास्त्र विभागातील एका विद्यार्थ्याने नाचणी बिस्किटे व इतर पदार्थांवर आधारित एक नवीन स्टार्टअप सुरू करून उद्योजकतेचा नवा मार्ग दाखवला.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण प्रा. अशोक चौधरी व प्रा. दिपाली पवार यांनी केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बीज राख्या व देशी वाणांची बीज बँक हे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. विकास नायकवडी यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप देवीकर, प्रा. अभिजीत घावटे, डॉ. हर्षद शिर्के, प्रा. शारदा थोरात, प्रा. मीरा शिंदे, रियाज इनामदार, हनुमंत करपे, रोहित वाळके, ऋषिकेश लबडे, निखिल मगर व दुर्गेश बारस्कर यांनी प्रयत्न केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button