Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूर भक्तिरसात न्हाऊन निघणार! शिवमहापुराण कथेसाठी प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन; आज सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }हर हर महादेवच्या जयघोषात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने शिरूर नगरी सोमवारी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. शिवमहापुराण कथा सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात आगमन होत असून त्यानिमित्त भव्य आणि दिमाखदार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पी. आर. धारीवाल फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने सायंकाळी ५ वाजता पाबळ फाटा चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी निनादत ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या ‘आशीर्वाद निवास’ (शिरूर बस स्थानकासमोर) येथे पोहोचणार आहे.

शिवमहापुराणाच्या अमृतवाणीसाठी देशभरातून हजारो भाविक शिरूरकडे येत असून शहरात सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वागत कमानी, रोषणाई, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. “भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाची शोभा वाढवावी,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिरूर नगरीत होणारा हा सोहळा केवळ मिरवणूक नसून श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा दिव्य उत्सव ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button