शिरूर( डेली न्यूज पोस्ट -२४)
दिनांक 19 सप्टेंबर रोजी शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी (समतानगर) व शिवाजी महाराज विद्यालय, गोलेगाव तसेच पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथे सामर्थ्य कल्याणकारी संस्था व तेजस्विनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मासिकपाळी व महिलांचे तसेच विद्यार्थिनींचे आरोग्य विषयक जागृती शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात महिलांचे व मुलींचे आरोग्य, विशेषतः मासिकपाळीतील समस्या, अंधश्रद्धा, सामाजिक रूढी व त्यातून निर्माण होणारा मानसिक त्रास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या प्रमुख रंजिता पवार व कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी उपस्थित महिलांशी व विद्यार्थिनींशी संवाद साधत मासिकपाळीकडे विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाने पाहण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले की मासिकपाळी ही प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होणारी स्वाभाविक व आरोग्यदायी प्रक्रिया असून, त्याबाबत संकोच किंवा लाज न ठेवता उघडपणे चर्चा होणे आवश्यक आहे. मासिकपाळी दरम्यान योग्य स्वच्छता राखली नाही तर संसर्ग, अॅनिमिया, प्रजननविकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने स्वच्छ सॅनिटरी नॅपकिन किंवा री-युजेबल पॅड वापरून दर ५-६ तासांनी बदलणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
रंजिता पवार यांनी महिलांना व मुलींना केवळ मासिकपाळीच नव्हे, तर घरगुती संघर्षांनाही सामोरे जावे लागते, त्यामुळे मानसिक दृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर सौ. वैशाली चव्हाण यांनी “योग्य व पोषक आहार, हिरव्या भाज्या, फळे, लोखंडयुक्त अन्न व दूध हे महिलांच्या आरोग्याचे मुख्य आधार आहेत” असे प्रतिपादन केले.

यामुळे स्वच्छता राखली जाण्याबरोबरच प्लॅस्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसानही कमी होणार आहे. या उपक्रमात तर्डोबाची वाडी (समतानगर) येथील सुमारे ५० महिला तर गोलेगाव येथील शिवाजी महाराज विद्यालयातील जवळपास १०० विद्यार्थिनी तसेच पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथील 25 विध्यार्थिनी आशा एकूण 175 पेक्षा विद्यार्थिनी संख्येने उपस्थित होत्या.
