Uncategorized

नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी निर्माण करणारे बना : डॉ. अनंत सरदेशमुख

चां. ता. बोरा महाविद्यालयात शिक्षण व औद्योगीक यांच्यातील परिसंवाद संपन्न

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता भविष्यात नोकरी निर्माण करणारी मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन म. चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर (MCCIA) चे कार्यकारी समिती सदस्य डॉ. अनंत सरदेशमुख यांनी केले.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विकास, कृषी उद्योग, ग्रामीण तंत्रज्ञान, रिटेल मॅनेजमेंट व आर्थिक निधी पाठबळ या विषयांवर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सरदेशमुख बोलत होते. त्यांनी आपल्या बीज भाषणात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून ३५ वर्षांखालील ६५ टक्के तरुण लोकसंख्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्टार्ट-अप, नवउद्योजकता आणि नावीन्यपूर्ण विचारांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. त्यांनी परिसरातील उद्योजकीय संधी आणि तरुण उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक शक्यतांवर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयातील शैक्षणिक व नवोन्मेषात्मक उपक्रमांची माहिती दिली तसेच परिसंवादामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘पांतस्थ’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. अरविंद शाळीग्राम (सीईओ, रिसर्च पार्क फाऊंडेशन, स. फु. पुणे विद्यापीठ), डॉ. देविदास गोल्हार (डायरेक्टर, CIEL), डॉ. योगेश कुलकर्णी (विद्यान आश्रम, पाबळ) यांनी उपस्थित उद्योजक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.दुपारच्या सत्रात डॉ. संदीप कडवे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग–विद्यार्थी संवाद सत्र झाले. यामध्ये डॉ. विकास कांदेकर, श्री. अविनाश चाबुकस्वार, श्री. गिताराम कदम, डॉ. रूपा रावल, श्री. नवनाथ साखरे आणि डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. व्यवसायासाठी लागणारे बीज भांडवल, स्टार्ट-अपची भूमिका, बाजारपेठेचा अभ्यास, निर्यात संधी आणि उद्योग टिकवण्याच्या रणनीती यावर सखोल चर्चा झाली.

या परिसंवादात २५ स्टार्ट-अप स्टॉल्स, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी तसेच सुमारे ३० व्यावसायिकांसह एकूण १५० पेक्षा अधिक सहभागींनी उपस्थिती नोंदवली. डॉ. दत्तात्रय बोबडे व डॉ. नारायण घणगावकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले, तर डॉ. मंजुषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button