शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा”
आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले
. कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत.
दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


