राष्ट्रीयविशेष

वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन; “प्रत्येक घरात लहान ग्रंथालय हवे” — साहित्यिक संजय कळमकर

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे. एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “मुले बिघडलेली नाहीत, आपण मोठेच दिशाभूल झालो आहोत,” असे नमूद करत त्यांनी पालकांना आत्मपरीक्षणाचे आवाहन केले. सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button