राष्ट्रीयविशेष

माणुसकीच्या ऊबेत उजळली दिवाळी — एस.टी. कर्मचारी नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी व  अनाथ मुलींपर्यंत स्नेहफराळाचा आनंद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व अन्य मान्यवर श्री मन शांती छात्रालय बो-हाडे मळा येथे दिवाळी फराळाचं वाटप करताना.
शिरूर बस डेपो येथे चालक वाहकांना फराळाचं वाटप करताना संजय कडेकर व अन्य मान्यवर 
नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी यांच्या साठी दिवाळी फराळ मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
ग्रीन क्लब च्या वतीने विशेष मुलींना दिवाळी फराळ देण्यात आला.
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}

दिवाळी म्हटली की घराघरात आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण साजरा होतो. पण काही जण असेही असतात, जे स्वतःच्या कुटुंबीयांपासून दूर राहून समाजासाठी काम करतात. अशाच माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा झरा शिरूर शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळाला. एस.टी.चे चालक–वाहक, नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी आणि अनाथ मुलींना दिवाळी फराळ देत शिरूरकरांनी या सणाला संवेदनशीलतेची नवी किनार दिली.
एस.टी. चालक–वाहकांसाठी ‘घरासारखी’ दिवाळी
शिरूर एस.टी. आगारात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने चालक–वाहकांसाठी खास फराळ आणि अभ्यंगस्नानाची व्यवस्था करण्यात आली. गरम पाणी, उटणे, सुगंधी तेल, साबण यांसह फराळाचे पदार्थ — चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली — यांचा मनसोक्त आस्वाद चालक–वाहकांनी घेतला.
या उपक्रमाचे आयोजन आगारातील कर्मचारी संजय कडेकर, सुनील जगदाळे, सुभाष डावरे, रामभाऊ जेऊघाले, कुंदन काडेकर, बापू जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रितपणे केले.
संजय कडेकर म्हणाले, “माझे वडील निवृत्ती कडेकर हे एस.टी.त वाहक होते. दिवाळीच्या काळात ते नेहमी ड्युटीवर असायचे. घराबाहेर सण साजरा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार गेल्या बावीस वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत.”
या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड व स्थानकप्रमुख दळवी उपस्थित होते. चालक–वाहकांनी “आज आम्हालाही आपल्या घरी दिवाळी साजरी केली असे वाटले ” असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा स्नेहफराळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्या वतीने नगरपरिषद मंगल कार्यालयात स्वच्छता विभागातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. अनारसे, लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी, शेव अशा नऊ पदार्थांच्या फराळाने कार्यक्रम रंगला.
सय्यद म्हणाले, “शहराची स्वच्छता आणि आरोग्य टिकवण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या परिश्रमाची व सेवेची  दखल घेत दरवर्षी आम्ही दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करतो.”
या वेळी
शहरातील पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या श्री. मनशांती छात्रालायातील विद्यार्थ्यांना ही दिवाळी फराळ देण्यात आला. याप्रसंगी महिबूब सय्यद यांच्या सह शिरूर प्रवासी संघाचे अनिल बांडे,काँग्रेस आयचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप, मनसेचे शहरप्रमुख आदित्य मैड,माजी शहरप्रमुख संदीप मैड, अविनाश घोगरे, फक्कड शेख, रवि लेंडे, जितेंद्र खांडरे, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड, राजेंद्र खेतमाळीस, आदी यावेळी उपस्थित होते .
ग्रीन क्लब, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर यांच्या वतीने “एक दिवा माणुसकीचा” या उपक्रमांतर्गत शिरूरच्या शासकीय विशेष मुलीच्या  बालगृहातील ५६ अनाथ मुलींना दिवाळी फराळ, सुगंधी तेल, अत्तर, उटणे, साबण आणि दिवाळी साहित्य देण्यात आले.
डॉ. अतुल जेठे, डॉ. अयोध्या क्षिरसागर, डॉ. सुरेश शिंदे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव आणि सिस्टर सोम्या यांच्या उपस्थितीत मुलींना ही दिवाळी अविस्मरणीय ठरली.
डॉ. जेठे म्हणाले, “माता-पिता नसलेल्या या विद्यार्थिनींना समाजाने आधार द्यावा. शिक्षण आणि आत्मविश्वास या दोन गोष्टींच्या बळावर या मुली स्वतःचे आयुष्य घडवू शकतात.”
माणुसकीचा सुगंध
शिरूरमध्ये यंदाची दिवाळी फटाके–फराळापुरती मर्यादित न राहता, संवेदनशीलतेचा सुगंध पसरवत ‘आपलेपण’ जपणारी ठरली. एस.टी. कर्मचारी असोत, स्वच्छता विभागातील कामगार असोत किंवा अनाथ मुली — प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुललेले हसू हीच खरी दिवाळी असल्याची भावना उपस्थितांच्या मनात उमटली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button