शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}
आंधळगाव (ता. शिरूर) येथील ऊर्जा डेअरी प्रकल्पात रोज रंग
भरून इमारतीचे सौंदर्य खुलविणारा एक पेंटर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही हातात ब्रश घेऊन काम करणारे विश्वनाथ कदम.
या ‘कदम मामांच्या’ अखंड सेवाभावाचा सन्मान करत कुतवळ उद्योग समूहाने एक हृदयस्पर्शी निर्णय घेतला — डेअरीवरील नव्या ‘माय ऊर्जा आऊटलेट’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी विश्वनाथ कदम यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हे त्यांच्या सेवाभावाचे साक्षीदेणारे दृश्य ठरले.
ऊर्जा डेअरीची स्थापना २२ फेब्रुवारी २००२ रोजी झाली. त्यावेळी बारामती तालुक्यातील सुपा गावचे विश्वनाथ कदम हे ५२ वर्षांचे होते. डेअरीच्या इमारतीवर त्यांनी केलेल्या रंगकामाने प्रभावित होऊन कुतवळ बंधूंनी त्यांना डेअरीमध्ये कायमस्वरूपी पेंटर म्हणून रुजू केले . त्यानंतर तब्बल २३ वर्षे त्यांनी आपल्या ब्रशने डेअरीचे रूप अधिक उजळवत व खुलवत ठेवले.
कुतवळ उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ आणि व्यवस्थापकीय संचालक राम कुतवळ यांनी नेहमीच प्रकल्पातील श्रमजीवी कर्मचाऱ्यांचा आदर राखला आहे.
“कदम मामांनी २३ वर्षांपासून प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. त्यांच्या या सेवारुपी ऋणातून उतराई होण्याच्या भावनेने उद्घाटन त्यांच्या हस्ते ठेवले , याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
कुतवळ बंधूंच्या या निर्णयाने उद्योग जगतात एक नवा आदर्श ठेवला आहे. श्रमिकांच्या हातात उद्घाटनाची फित देऊन त्यांनी श्रमाचे खरे मोल समाजासमोर अधोरेखित केले आहे.
उद्योगांच्या गजबजाटात अनेकदा न दिसणारा श्रमाचा चेहरा — आज ऊर्जा डेअरीच्या रंगलेल्या भिंतींसारखा उजळून निघाला आहे. विश्वनाथ कदम यांच्या हातातील तोच ब्रश, आज त्यांच्या आयुष्यातल्या गौरवाचा रंग भरतो आहे.
उदघाटनाच्या वेळी शहाजीराव कुतवळ, अनिल काटे, अमोल पाटील, आदित्य काळभोर, मच्छिंद्र ओव्हाळ, प्रा. चंद्रकांत धापटे आदी उपस्थित होते.
कुतवळ बंधु नेहमीच सामाजिक कार्यासह समाज हिताच्या विविध उपक्रमात सातत्याने सहभाग घेत असतात. अनेक जणांना शिक्षणासह आरोग्य तसेच सामाजिक कामांकरिता योगदान देत असतात व याचा कोठेही गाजावाजा करत नाही. निरपेक्ष व कर्तव्य भावनेने काम करणारे कुतवळ बंधू माणुसकी व सहृदयतेचे प्रतीक आहे. सर्वाप्रति आदर ममत्व व समभाव जपत काम करणारे कुतवळ बंधू या परिसरात आपला उद्योग व्यवसाय उत्तम पणे चालवून समाजाचा हिताचा साठी विविध उपक्रमास नेहमीच पाठबळ देत असतात. 