एमआयडीसीत सिगारेट चोरीचा गुन्हा उघड; ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
-

oplus_131074
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24) :
राजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडिया गोदामातून आयटीसी कंपनीच्या सिगारेट व इतर वस्तूंची झालेली मोठ्या प्रमाणावरील चोरी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणली.
चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली. 
गिल म्हणाले की राजणगाव एमआयडीसीतील चमाडिया गोदामात आयटीसी कंपनीची सिगारेट, बिस्किटे, साबण आदी माल साठवून ठेवला जातो. हा माल ‘मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि.’च्या चार इलेक्ट्रिक पिकअप वाहनांद्वारे डिलरकडे पाठविण्यात येतो. १७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गोदामात उभ्या असलेल्या मालवाहू पिकअपमध्ये भरलेला माल घेऊन, गेटवर चलनाची नोंद करून पलायन केले. या चोरीत ६५ लाख ९८ हजार ८९७ रुपये किमतीचा माल लंपास करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी झाले असल्याने अशा प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटना देशाच्या आर्थिक प्रगतीस खूप धोकादायक आहेत. प्रकरणे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी विशेष लक्ष घालून गुन्हा उघड आणण्यासाठी वेगवेगळ्या टीम नेमून सूचना दिल्या होत्या
या प्रकरणी दीपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४७८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सिगारेटची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (पुणे ग्रामीण) यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान चोरीस वापरलेली इलेक्ट्रिक पिकअप काही अंतरावर सोडून दिल्याचे, तर ५४ लाख ५३ हजार रुपये किमतीची सिगारेट दुसऱ्या वाहनातून नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना वाघोली परिसरातील कावेरी हॉटेलजवळ संशयित वाहन सापडले. चौकशीत सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने दीपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानुसार प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली) यास अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीचा माल व वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे व अमोल रासकर सहभागी होते. पुढील तपास अविनाश थोरात करीत आहेत.