Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरूर रिक्रीएशन क्लबमध्ये दिवाळी अंक प्रदर्शन — वाचकांसाठी ४६ दिवाळी अंक उपलब्ध

वाचन संस्कृती जपण्यासाठी शिरूर रिक्रिएशन ग्रंथालयाचा उपक्रम

दिवाळीअंक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. दीपक गायकवाड व अन्य मान्यवर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
दिवाळी म्हटले की प्रकाश, रंगोळी, फटाके आणि फराळासोबतच प्रत्येक वाचकाला आतुरता असते ती दिवाळी अंकांची! मराठी साहित्यविश्वात दीर्घ परंपरा लाभलेल्या या अंकांमधून प्रत्येक वर्षी समाज, संस्कृती, कला, राजकारण, विज्ञान, मनोरंजन यांचे विविध पैलू उलगडले जातात. याच पार्श्वभूमीवर शिरूर रिक्रिएशन क्लब अर्थात शिरूर ग्रंथालयात यंदा दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून, वाचकांसाठी तब्बल ४६ विविध विषयांवरील दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सेवानिवृत्त प्रा. डॉ. दीपक गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सजग नागरिक घडवण्यासाठी वाचन, चिंतन, मनन आणि लेखन ही चारही साधने आवश्यक आहेत. दिवाळी अंक हे समाजमनाचे आरसे असून, ते वाचकांपुढे विचारांचे नवे क्षितिज उघडतात.” अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध विषयांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव आणि वाचनासाठीचे डिजिटल पर्याय यामुळे पारंपरिक अंक विकत घेऊन वाचण्याची सवय काहीशी कमी होत असली, तरीही दिवाळी अंकांविषयीची आकर्षणता आजही कायम आहे. “वर्षातून एकदाच प्रकाशित होणाऱ्या या अंकांची प्रतीक्षा वाचक आजही तितक्याच उत्साहाने करतात,” असे ग्रंथालयाचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले.
ग्रंथपाल कल्पना मोरे यांनी सांगितले की, “दोनशे रुपये वार्षिक सभासद फी भरून वाचकांना हे दिवाळी अंक वर्षभर वाचता येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”
यंदाच्या वर्षी उपलब्ध असलेल्या ४६ दिवाळी अंकांमध्ये महिलाविषयक, आरोग्य, क्रीडा, कृषी, पाककला, रहस्यकथा, सौंदर्य, राशिभविष्य, पर्यावरण, सामाजिक, धार्मिक तसेच विनोदी विषयांवरील समृद्ध सामग्रीचा समावेश आहे.
प्रदर्शनात उपलब्ध असलेल्या प्रमुख अंकांमध्ये – छावा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, ऍग्रोवन, साप्ताहिक सकाळ, केसरी, पुढारी, सामना, मार्मिक, प्रपंच, छात्र प्रबोधन, भारत पर्यटन, सकाळ मनी, जत्रा, पुरुष उवाच, क्रिककथा, नवल, धनंजय, किस्त्रीम, मनशक्ती, बालकुमार, घराचा वैद्य, मैत्र, ऋतूरंग, वसुधा, शतायुषी, वेदांत श्री, धमाल धमाका, आवाज, गृहशोभीका, गुंफन, आला रे आला, पुरुष स्पंदन, कालनिर्णय, मेनका, गावगाथा, माझे पुण्यभूषण, भवताल, आजीच्या गोष्टी, गोंदन, महाअनुभव, अग्रेक्रॉस, गर्भसंस्कार यांचा समावेश आहे.
दिवाळी अंकांचे हे प्रदर्शन शिरूरमधील वाचनसंस्कृतीला नवे बळ देणारे ठरत असून, साहित्यप्रेमींसाठी आनंदाचा सोहळाच ठरला आहे.‾

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button