राष्ट्रीय

पिंपरखेड येथे आठ वर्षाच्या नर बिबटया जेरबंद, मागील काही महिन्यापासून शिरूर तालुक्यातील विविध गावातून ९० हून अधिक बिबटे जेरबंद

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कायम असतानाच पिंपरखेड येथे सोमवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तब्बल आठ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

नगरसेवक संतोष थेऊरकर यांना वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात येत असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. पिंपळसूटी येथील रामभाऊ काळे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास सुमारे एक ते दीड वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला होता. त्यापूर्वी शुक्रवारी (दि. ७) ताराचंद पारखे यांच्या शेतात, तर मंगळवारी (दि. ११) फिरंगाई मळ्यात दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. अवघ्या आठवडाभरात तीन बिबटे जेरबंद झाल्याने पिंपळसूटी परिसरातील ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर सातत्याने चर्चेत आहे. पिंपळसूटी परिसरात जुलै २०२६ या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्यांचे दर्शन, पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि बिबटे जेरबंद करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आंबळे येथील आंब्याच्या बागेत ४ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद करण्यात आला होता या बिबट्यास माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे.

डिसेंबर २०२५ पासून शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वनविभागाच्या कारवाईत आतापर्यंत ९० हून अधिक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाकडून पिंजरे लावणे, शोधमोहीम राबविणे आणि संवेदनशील भागात गस्त वाढविण्याचे काम सुरू आहे.

पिंपरखेड येथे आठ वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर पाहता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button