राष्ट्रीय

शिरूर बायपासवरील अपघातांनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांना वेग हॉटेल संग्रामसमोरील धोकादायक दुभाजकाचे बांधकाम सुरु

पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्सची व्यवस्था

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे–अहिल्यानगर बायपास रस्त्यावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांना आता वेग आला आहे. हॉटेल संग्रामसमोरील फोडण्यात आलेला दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, शिरूर पोलिसांनी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडला जाणाऱ्या विविध ठिकाणी तब्बल ३८ बॅरिकेड्स उभारले आहेत. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी अनधिकृतपणे रस्ता ओलांडण्यास आळा बसण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी हॉटेल संग्रामसमोर झालेल्या भीषण अपघातात प्रथमेश प्रकाशराव लाड आणि किशोर यादव यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर बायपासवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही गंभीर अपघात झाले असून, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात शिरूरमधील एका युवकाला प्राण गमवावे लागले होते.

दुभाजक फोडून वाहनांची धोकादायक ये-जा

हॉटेल संग्रामसमोरील दुभाजक यापूर्वी बंद करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनंतर  दुभाजक फोडून त्या ठिकाणी वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी अनधिकृत मार्ग तयार केला. त्यातून दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहने कोणतीही सुरक्षितता न पाळता रस्ता ओलांडत होती. बायपासवरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर हा दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत आता दुभाजकाचे पक्के बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांकडून ३८ बॅरिकेड्स

दरम्यान, शिरूर पोलिसांनी बायपास रस्त्यावर धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडला जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तेथे बॅरिकेड्स लावण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी एकूण ३८ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

कोळपे हॉस्पिटलसमोर तसेच अन्य काही ठिकाणीही बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी मनमानीपणे रस्ता ओलांडण्याऐवजी निर्धारित मार्गाचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उड्डाणपुलाखाली वाहतूक वाढल्याने कोंडी

बायपासवरील धोकादायक क्रॉसिंग बंद केल्यानंतर बाबुरावनगरकडे जाणारी अनेक वाहने सी. टी. बोरा कॉलेजजवळील उड्डाणपुलाखालून जाऊ लागली. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर वाहनांची संख्या अचानक वाढून काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.

एका ठिकाणावरील धोकादायक मार्ग बंद केल्यानंतर वाहतुकीचा ताण दुसऱ्या मार्गावर वाढत असल्याने बायपासवरील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतीदिनानिमित्त डेली न्यूज पोस्ट 24टीम च्या वतीने विनम्र अभिवादन

अंडरपास पुन्हा सुरू करण्याची गरज

काही वर्षांपूर्वी बायपासवर दुचाकीस्वार तसेच छोट्या चारचाकी वाहनांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी हॉटेल पल्लवीसमोरील पुलाखालून शिरूरच्या दिशेने जाण्यासाठी अंडरपासची व्यवस्था करण्यात आली होती. या मार्गातून वाहनांची ये-जा सुरू होती. मात्र पावसाळ्यात ओढ्याचे तसेच पावसाचे पाणी अंडरपासमध्ये शिरल्याने हा मार्ग बंद पडला.

सुरक्षित पर्यायी मार्ग म्हणून या अंडरपासचे महत्त्व लक्षात घेता, तो पुन्हा सुरू करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अंडरपासमध्ये पाणी साचणार नाही, तसेच पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहील, यासाठी पाणी निचरा व्यवस्था, पंपिंग अथवा अन्य तांत्रिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

शहरातून बायपासकडे पर्यायी मार्गाची गरज

शिरूर शहरातून बायपासकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित आणि नियोजित पर्यायी मार्ग विकसित करण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास आणि बायपास यांचा समन्वय साधून वाहतूक आराखडा तयार केल्यास धोकादायक ठिकाणी होणारे अनधिकृत क्रॉसिंग कमी होऊ शकते.

सध्या हॉटेल संग्रामसमोरील दुभाजक बंद करण्याचे काम आणि पोलिसांकडून बॅरिकेड्सची व्यवस्था ही तातडीची उपाययोजना असली, तरी बायपासच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ एका-दोन ठिकाणांपुरता मर्यादित नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

‘ब्लॅक स्पॉट’ची कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक

शिरूर बायपासवर वेगाने धावणारी वाहने, अनधिकृत क्रॉसिंग, अपुऱ्या सुरक्षित मार्गांची उपलब्धता आणि वाहतुकीचा वाढता ताण यामुळे काही ठिकाणे सातत्याने अपघातप्रवण ठरत आहेत. अशा ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून त्यांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, स्पीड कंट्रोलची साधने आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे उभारणे गरजेचे आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांनंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच धोकादायक ठिकाणे ओळखून त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे आवश्यक आहे. हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचे सुरू झालेले काम आणि पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र शिरूर बायपासवरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रशासन, पोलीस, महामार्ग यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांचा समन्वय साधून दीर्घकालीन वाहतूक सुरक्षा आराखडा तयार करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button