शिरूर { डेली न्यूह पोस्ट टीम 24 }नागरगाव हद्दीतील नलगेवस्ती जवळ चौफुला ते शिरूर रोडवर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. भरधाव ट्रकने सेलेरो कारला दिलेल्या धडकेत हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन राजहंस काळे (वय ३४), त्यांची मुलगी आराध्या पवन काळे (वय ९) रा. निमोणे, ता. शिरूर आणि त्यांचे मेव्हणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (वय ३८) सध्या रा. बाबुराव नगर, शिरूर (मूळ रा. गुनवडी, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला. वंदना पवन काळे (वय ३०) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात शुक्रवारी (दि. १४) पहाटे झाला. सेलेरो (एमएच १२ एसक्यू ५४४१) ही कार निमोणेकडे जात असताना शिरूरकडून येणाऱ्या ट्रकने (एमएच ०९ ईएम २४६४) भरधाव वेगात येत कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर वंदना काळे गंभीर जखमी झाल्या. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी संजय ज्ञानदेव काळे (रा. निमोणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ)(ब), १०६(१), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हवालदार भगत यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक नकाते तपास करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या दुर्घटनेने निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.