शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरात सामाजिक बांधिलकी जपत सुरु झालेल्या ‘स्पंदन प्रतिष्ठान’च्या स्वर्गरथ सेवेने दहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी या सेवेला दशकपूर्ती होत असून, त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन २०१६ मध्ये जैन समाजातील काही युवकांनी शहरात अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक आणि माफक दरात वाहन सेवा उपलब्ध व्हावी, असा विचार मांडला. त्या विचाराला मूर्त रूप देत स्वतःच्या आणि समाजातील बांधवांच्या आर्थिक योगदानातून वाहन खरेदी करण्यात आले व त्याचे ‘स्वर्गरथ’मध्ये रूपांतर करण्यात आले.
वाहनाच्या मागील बाजूस मृतदेह ठेवण्यासाठी टेबलसदृश व्यवस्था करण्यात आली.या सेवेमुळे एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, मृतदेह घरापासून अमरधाम स्मशानभूमीपर्यंत नेण्याची सोय सन्मानाने आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली.
गेल्या दहा वर्षांत हजारो मृतदेह स्वर्गरथद्वारे स्मशानभूमीत पोहोचविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, चालक सुट्टीवर असताना किंवा अनुपलब्ध असताना स्पंदन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वतःचे दैनंदिन व्यवसायिक काम बाजूला ठेवून चालक म्हणून सेवा बजावतात. हा सेवाभावच या उपक्रमाची खरी ओळख ठरली आहे.
दरम्यान, शिरूर शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण व शहरीकरण झाले असून उपनगरांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर स्वर्गरथ सेवा अधिक महत्त्वाची आणि उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिष्ठानचे राहुल बोथरा यांनी सांगितले.
दशकपूर्तीच्या निमित्ताने यंदापासून ‘शवपेटी’ सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.



