राष्ट्रीय

रामलिंग महाराज पालखी सोहळ्यात उत्साहात सुरुवात

हजारो भाविकांचा पालखी सोहळ्यात सहभाग

oplus_131074

शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}सर्वत्र भगव्या पताका अन भगवे झेंडे व ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी ढोल ताश्या व सोबतच राज्यातील प्रसिध्द असणाऱ्या ब्रॉंस बॅन्ड वर वाजविण्यात येणाऱ्या मराठी हिंदी भक्ति गीत भावगीते व देशभक्तीपर गीताच्या धून व सर्वधर्मीय नागरिकाच्या सहभागात ॐ नम: शिवाय ,हर हर महादेव व रामलिंग महाराज कि जयच्या जयघोषात शिरुर पंचक्रोशी व शहराचे आराध्यदैवत असणाऱ्या रामलिंग महाराज यांच्या पालखी सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरवात झाली.

शिरूर येथील रामलिंग महाराज यांची यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीला भरत असते. यात्रेचे तीन दिवस असतात. मुख्य यात्रा महाशिवरात्रीस रामलिंग मंदिर या ठिकाणी असते. आदल्या दिवशी पालखी सोहळा असतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यतीने यात्रेचा समारोप होतो.

      आज दुपारी येथील शिवसेवा मंदिरातून पालखी सोहळ्यास सुरवात झाली. यावेळी प्रसिद्ध उद्योपती व रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरूरच्या कन्या व पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे,पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, , भाजपचे नेते धर्मेंद्र खांडरे,रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी पोपटराव दसगुडे ,शिवसेवा मंडळाचे ट्रस्टी मनसुख गुगळे,बलदेवसिंग परदेशी , यांच्या सह नगरसेवक नगरसेविका,व अनेक मान्यवर उपस्थित होते.

    पालखीच्या सर्वात पुढे सनई चौघडाचे पथक होते. त्यानंतर परिसरातील झांज आणि लेझीम पथक होते. तसेच डोणे, ता.मावळ येथील झांज पथक होते .

 पालखीच्या पुढे बाल वारकऱ्यांची दिंडी होती. शिवनामाचा जप व विविध अभंग त्यांनी यावेळी सादर केले. पालखी सोहळ्यात सर्वधर्मीय नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

रामलिंग महाराज पालखी सोहळ्याचे आकर्षण म्हणजे राज्यातील नामांकित ब्राँस बँन्डचा सहभाग . चाळीसगाव येथील सदगुरु ब्रास बँन्ड, आटपाटी येथील महाराष्ट्र ब्रास बँड, बारामती येथील अमर ब्रास बँड पालखी सोहळ्यात होते. विविध धार्मिक आणि जुनी हिंदी आणि मराठीतील भक्तीगीत आणि भावगीताचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले.

पुणे -नगर रस्त्यावर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी नगरपरिषदेचा वतीने पालखीचे स्वागत केले .पालखीचा स्वागता साठी शहरातील प्रमुख मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी मार्गावर विविध संस्था व्यक्ती, संघटना यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी खाद्यपदार्थ व फळांचे सरबत चहा दूध याचे वाटप केले 

कापड बाजार मित्र मंडळ यांनी 120 किलो साबुदाण्याचे वडे व मठ्ठा याचे वाटप केले. त्याच बरोबर रामआळी ,सरदार पेठ, हलवाई चौक , सुभाष चौक, सोनार आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार ,डंबेनाला, या परिसरात ठिकठीकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.

रात्री उशिरा पालखी सोहळा शिरूर बसस्थानका समोरील पुणे नगर रस्त्याने हर हर महादेव ओम नमः शिवाय चा गजर करत पाबळ फाटा, श्री हाईट्स सोसायटी, आनंद सोसायटी, रामलिंग रोड, या मार्गाने रामलिंग मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे.

 रामलिंग येथे पालखी सोहळा पोहोचल्यावर ग्राम प्रदर्शना नंतर पालखी रामलिंग मंदिर या ठिकाणी विसावेल. उद्या रविवार दिनांक १५ फेब्रुवारी हा महाशिवरात्र यात्रेचा मुख्य दिवस आहे.रामलिंग मंदिर व पालखी मार्गाच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे रात्री शोभेचे दारूकाम ही करण्यात येणार आहे.

oplus_131074

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button