धार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूरमध्ये पं. प्रदीपजी मिश्रा यांचे भव्य मिरवणुकीने स्वागत ‘हर हर महादेव’च्या जयघोषात नगरी शिवमय

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने सोमवारी शिरूर नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. शिवमहापुराण कथा सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात दिमाखदार मिरवणुकीने आगमन झाले.

पी. आर. धारीवाल फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या मिरवणुकीस   सायंकाळी ५ वाजता पाबळ फाटा चौकातून झाली. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाब फुलांच्या वर्षावात आणि “हर हर महादेव”च्या निनादात मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या ‘आशीर्वाद निवास’ (बसस्थानकासमोर) येथे पोहोचली.

महिलांचा मंगल कलश, ढोल-ताशांचा गजर

मिरवणुकीच्या अग्रभागी डोक्यावर मंगल कलश घेऊन महिला मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. जळगाव येथील प्रसिद्ध वाद्यवृंद आणि मर्दानी बाज असलेले एकलव्य ढोल-ताशा पथक यामुळे वातावरण आणखी भारावून गेले. प्रत्येक चौकात भाविकांनी फुलांचा वर्षाव करत मिश्रा यांचे स्वागत केले.

पंडित मिश्रा ज्या वाहनात विराजमान होते, ते वाहन ‘ॐ’ आणि ‘त्रिशूल’ या आकर्षक फुलसजावटीने नटले होते. पाबळ फाटा येथे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल, त्यांच्या ज्येष्ठ भगिनी, पत्नी  दिनाभाभी धारिवाल, उद्योगपती आदित्य धारिवाल, साक्षी धारिवाल तसेच नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे  यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर पुणे–अहिल्यानगर मार्गे मिरवणूक धारीवाल यांच्या बंगल्यावर पोहोचली. तेथे क्रेनच्या साहाय्याने भव्य पुष्पहार घालून मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला—हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

सर्वपक्षीय उपस्थिती, शहरात उत्सवाचे वातावरण

मिरवणुकीत उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सुनील धाडीवाल, विनोद धाडीवाल, विजय दुगड, जाकीरखान पठाण यांच्यासह विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शहरभर स्वागत कमानी, रोषणाई, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. देशभरातून हजारो भाविक शिवमहापुराणाच्या अमृतवाणीसाठी शिरूरकडे येत असून वातावरणात उत्साह आणि भक्तिभाव ओसंडून वाहत आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वयंसेवकांचीही मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती.

शिरूर नगरीत झालेली ही मिरवणूक केवळ स्वागत सोहळा नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा दिव्य उत्सव ठरली. अवघे शिरूर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले आणि शिवभक्तीचा महासागर उसळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button