
काही माणसे जन्माला येतात, समाजाला दिशा देतात आणि शांतपणे निघून जातात — पण त्यांच्या कार्याचा प्रकाश पिढ्यानपिढ्या तेवत राहतो. चंद्रकांत शोभाचंद बाफना हे असेच एक ज्ञानप्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व होते. काही व्यक्ती आपल्या ज्ञान, सेवाभाव आणि समाजाविषयीच्या नितांत बांधिलकीमुळे समाजात वेगळे स्थान निर्माण करतात. प्रसिद्धीचा गजर न करता, शांतपणे आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने कार्य करत ते समाजासाठी आधारवड ठरतात. शिरूर परिसरातील असेच सर्वांचे आधारवड ठरलेले माजी उपनगराध्यक्ष, शिक्षणप्रेमी आणि प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत सोभाचंद बाफना यांच्या निधनाने शिरूरच्या सार्वजनिक जीवनातील एक विचारवंत व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
शिक्षण, व्यवसाय, बांधकाम, शेती, अध्यात्म, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत चंद्रकांतभाऊंचा सहज संचार होता. मात्र हा केवळ संचार नव्हता; प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून त्यामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची त्यांची वृत्ती होती. कोणताही प्रश्न उद्भवला की “यावर चंद्रकांतभाऊंचे मत काय?” अशी उत्सुकता अनेकांना असे. कारण त्यांच्या विचारांत अभ्यास, संयम आणि सम्यक दृष्टिकोन असायचा.
मूळचे वडगाव मावळ येथील असलेले चंद्रकांतभाऊ पाच भावंडांच्या कुटुंबात जन्मले. पुढे ते शिरूरच्या सोभाचंद बाफना कुटुंबात दत्तक आले. लहानपणापासूनच अभ्यासू असलेल्या भाऊंनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात नेहमी प्रथम क्रमांक पटकावला. पुढे त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, स्पष्ट विचार आणि अभ्यासातून घडलेले नेतृत्व ही त्यांची ओळख होती.
कुटुंबातील संस्कारांमुळे माणुसकी आणि मानवतेचा धर्म त्यांनी आयुष्यभर जपला. जात-धर्माचा विचार न करता सर्वांना माणूस म्हणून सन्मान देणे हा त्यांचा स्वभाव होता. गरजूंना मदत करणे, इतरांमधील चांगले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आणि योग्य जबाबदाऱ्या देणे ही त्यांची गुणग्राहक वृत्ती अनेकांना प्रेरणा देणारी ठरली.
समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हे प्रभावी साधन असल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळात पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी विद्याधाम प्रशालेत आठवीपासून विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीतून शिकवणारा सेमी-इंग्लिश उपक्रम सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वाढला.
काळाची पावले ओळखत त्यांनी पुढे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची गरज अधोरेखित केली आणि विद्याधाम प्रशालेत रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या शाळेसाठी उभारलेली भव्य इमारत आणि आधुनिक सुविधा त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, कला-क्रीडेला वाव मिळावा यासाठी विद्याधाम प्रशालेत हजारो विद्यार्थ्यांची क्षमता असलेले भव्य प्रेक्षागृह उभारण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांप्रमाणे संधी मिळावी, ही त्यामागील त्यांची प्रामाणिक भूमिका होती.आचार्य आनंदऋषी,माजी मंत्री मदन बाफना व उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचे भाऊंना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
शिक्षणाबरोबरच भाऊंना माती आणि शेतीविषयीही तितकेच प्रेम होते. यशस्वी व्यावसायिक असतानाही त्यांनी शेतीत प्रयोगशीलता जपली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. सूक्ष्म जलसिंचन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि विविध फळबागांचे प्रयोग यामुळे त्यांचे शेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले. त्यांनी फुलवलेल्या चिकू आणि आंब्याच्या बागा त्यांच्या कष्टांची साक्ष देत राहतील.

चंद्रकांतभाऊंना विविध विषयांचे वाचन, चिंतन आणि मनन करण्याची सवय होती. गावापासून जागतिक स्तरापर्यंतच्या आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक किंवा राजकीय विषयांवर ते सहजपणे चर्चा करत. त्यामुळे त्यांच्याशी झालेली चर्चा अनेकांसाठी ज्ञानवर्धक ठरत असे.भाऊ श्रद्धाळू होते. अंधश्रद्धाळू नाही.
सार्वजनिक जीवनातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या नियामक मंडळातील पदाधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्था प्रतिनिधी तसेच जैन विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणून अध्यात्म क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली.
राजकीय क्षेत्रात त्यांनी शिरूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद भूषवले. अभ्यासपूर्ण भूमिका, पारदर्शक कारभार आणि लोकसहभाग यावर त्यांचा भर होता. शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रमांना चालना दिली. त्यांच्या कार्यशैलीतील संवेदनशीलता आणि सर्वसामान्यांविषयीची आस्था यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.
स्वतःच्या आयुष्यातील चढ-उतार शांतपणे स्वीकारण्याची ताकदही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. प्रतिकूल परिस्थितीतही कुणाविषयी कटुता न बाळगता नव्याने उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या कुटुंबालाही दिली. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा हा वारसा त्यांचे पुत्र प्रकाश आणि संजय बाफना तसेच परिवार पुढे नेत आहेत.
सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी त्यांच्या निधनाने शिरूर परिसरातील सार्वजनिक जीवनात एक अभ्यासू, सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व हरपले. विचारांनी समृद्ध आणि कृतीतून समाजाला दिशा देणारा हा ज्ञानप्रज्ञावंत आता स्मृतीत उरला आहे.
मृदुभाषी, ज्ञानाचा अखंड साधक,माती-शेतीचा अभिमानी.मातीतून फुलवली समृद्धीची बाग,नवनिर्माणाचा ध्यास अखंड साकार.शिक्षणातून परिवर्तनाचा विश्वास,चिंतनातून सोडवली प्रश्नांची कोडी .प्रगतीची स्वप्ने पाहत राहिले आयुष्यभर,जनकल्याणासाठी अखंड धावपळ करणारे मन.इतरांच्या आयुष्यात आनंद पेरला क्षणो क्षणी .मृदुभाषी अन् ज्ञानाचा हा अखंड साधक,शेती आणि मातीचा अभिमानाने वाहक।
मातीतून फुलवली शाश्वत समृद्धी,
जगण्याची त्यांची होती अनोखी विधी।।ध्यास हा सदा नवनिर्माणचा,शिक्षणातून घडवण्याचा परिवर्तनाचा।अभ्यासात विलक्षण गोडी होती,चिंतनातून सोडवली प्रश्नांची कोडी।।
स्वप्न पाहिले सदा प्रगतीचे,
स्वप्नपूर्तीसाठी अखंड धावले।
जनकल्याण अन् इतरांच्या आयुष्यात,
आनंद अन् समाधान पेरण्या झटले।।जीवन आपले थांबता,जणू एक विचारचक्र थांबले…
पण विचारांचा सुगंध मात्र
शिरूरच्या मातीत कायमचा उमटला ।।
अजातशत्रू, सुसंस्कृत,अभ्यासू, सर्वसमावेशक नेतृत्व
शिरूरकरांच्या हृदयात चिरंतन राहिल.
चंद्रकांत भाऊना भावपुर्ण आदरांजली.