महाराष्ट्र
शिवपानंद रस्ते मोकळे करण्यास गती; ११७ पैकी ३८ रस्ते खुले
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद असलेले शिव व पानंद शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेला शिरूर तालुक्यात गती मिळत आहे. तालुक्यातील एकूण ११७ अतिक्रमित रस्त्यांपैकी आतापर्यंत ३८ रस्ते खुले करण्यात आले असून ६५ रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी समन्वयक विजय शेलार, रविंद्र सानप, रवींद्र खुडे आदी उपस्थित होते. पवळे म्हणाले, शेतरस्ते उपलब्ध नसल्याने शेतमाल बाजारात नेणे, शेतीसाठी आवश्यक साधने पोहोचवणे तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणास अडचणी निर्माण होत होत्या.
यामुळे स्थानिक पातळीवर वादही वाढत होते. या पार्श्वभूमीवर राज्यभर जनजागृती करत आंदोलन छेडण्यात आले.
मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनानंतर शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांत रस्ता खुला करण्याचे निर्देश देण्यात आले असून मोजणी व पोलिस बंदोबस्ताचे शुल्कही माफ करण्यात आले आहे. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा योजना’ अंतर्गत शिवपानंद रस्ते करण्याचा निर्णय घेतल्याचे पवळे यांनी सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनानंतर योजनेत दुरुस्ती करून अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंमलबजावणीस विरोध करणाऱ्यांवर कारवाई करत आधारकार्ड व फार्मर आयडी पाच वर्षांसाठी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तालुक्यात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भूमी उपअधीक्षक अमोल भोसले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या समन्वयातून कामाला वेग आला आहे. आतापर्यंत १६३८ शेती गटांची मोजणी पूर्ण झाली असून सुमारे १६१ किलोमीटर लांबीचे रस्ते खुले झाले आहेत. तसेच ४८ रस्त्यांची इतर अधिकारात सातबारा नोंदही करण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ व १८८ अंतर्गत चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवपानंद रस्ते खुले झाल्यामुळे गावांच्या सीमा स्पष्ट होणार असून शेतकऱ्यांना थेट रस्त्यांची सुविधा मिळाल्याने शेती व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास पवळे यांनी व्यक्त केला.
रस्त्यांच्या कडेला झाडांऐवजी दगडी क्रमांक चिन्हे बसवावीत तसेच रस्ते मजबुतीकरणासाठी ‘झिरो पेंडन्सी’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

