गुन्हेगारी
शिरूरमध्ये गावठी पिस्टलसह दोघे ताब्यात ; एटीएसची धडक कारवाई
शिरूर {डेली न्यूज पोस्ट २४ टीम }पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शिरूर परिसरात धडक कारवाई करत दोन संशयितांना गावठी पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. ८) सायंकाळी शिरूर-सतरा कमान रोडवरील पांजरपोळ समोर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस पथकाला एका व्यक्तीकडे अवैध अग्निशस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून छापा टाकण्यात आला.
यावेळी सुमित वसंत शेळके (वय २०, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व साजिद रफिक खान (वय ३०, रा. मंगलमूर्ती नगर, शिरूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत साजिद खान याने हे पिस्टल सुमित शेळके याला विक्री केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः, सुपा एमआयडीसी (अहिल्यानगर) येथे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टच्या वादातून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही त्यांच्या विरोधात नोंद आहे
.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे पिस्टल नेमके कोठून आणले व कोणत्या उद्देशाने वापरण्यात येणार होते, याचा तपास शिरूर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व शिरूर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक, तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नीरज पिसाळ यांचे पथकांने केली.

