Uncategorizedनिधन वृत्तराष्ट्रीय
प्राचार्य सीताराम गोसावी यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सीताराम गोसावी (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि पुरोगामी चळवळीमध्ये शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी देहादान केले.
त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. सीमा गोसावी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्राध्यापिका तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरच्या कार्याध्यक्षा व रसिक. विचार मंचच्या सदस्या प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांचे ते वडील होत.

प्राचार्य गोसावी यांनी आयुष्यभर शिक्षण, विवेकवाद आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य केले. सोलापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयासहऔंध, शिरवळ, मलकापूर, पंढरपूर, अशा विविध महाविद्यालयात उपक्रमशील प्राचार्य म्हणून 20 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावली आहे.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. विशेषतः ग्रामीण, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते राज्यभर प्रसिद्ध होते.

प्राचार्य गोसावी यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या कार्याची परंपरा आणि समाजप्रबोधनाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या निधनाने विवेकवादी चळवळीतील एक अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.




