महाराष्ट्र

फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २४.७७ लाखांची वसुली

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या सौजन्याने व तालुका विधी सेवा समिती, घोडनदी-शिरूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांना न्यायालयीन सेवा थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, घोडनदी-शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोकअदालतीचे उद्घाटन निवृत्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्याचे आवाहन केले.

“तालुका विधी सेवा समिती घोडनदी-शिरूर ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार थेट नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेऊन वेळ, पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळावा,” असे मोमीन यांनी सांगितले.

कार्यक्रमास घोडनदी-शिरूर वकील संघ (बार असोसिएशन) अध्यक्ष उदय सरोदे, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह न्यायालयातील एच. आर. पाटील, एस. डी. वानखेडे, डी. बी. डोमाळे, सी. एम. खारकर, ए. जी. तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

या लोकअदालतीसाठी एकूण १२ दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी चार प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १८ फौजदारी प्रकरणांपैकी पाच प्रकरणे मार्गी लावण्यात आली. अशा प्रकारे एकूण नऊ प्रकरणे लोकअदालतीत निकाली निघाली.

लोकअदालतीदरम्यान विविध प्रकरणांमधून एकूण २४ लाख ७७ हजार ५९८ रुपयांची वसुली करण्यात आली. यशस्वीरीत्या पार पडलेल्या या फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीची सांगता समाधानकारक वातावरणात करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button