Uncategorized

घोडनदीच्या पाणीपातळीत वाढ; शिरूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरणातून विसर्ग सुरू; मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षकांची नदीकाठाची पाहणी, आवश्यकता भासल्यास स्थलांतराची तयारी पूर्ण

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सुरू असलेल्या  पावसामुळे तसेच धरण क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणातून घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी घोडनदीच्या पाणीपातळीत वाढ़ झाली असून, शिरूर शहरातील नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

घोडनदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सायंकाळी नदीकाठ परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

रात्री उशिरापर्यंत पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यास नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी शिरूर नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ६ व ७ येथे निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार नगरपरिषदेचे मंगल कार्यालय, इतर पालिका शाळा तसेच खासगी शाळांमध्येही नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 1800 233 2123 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सचिन वाळुंज (मो. 9922789405) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून घोडनदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीनुसार पुढील उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button