Uncategorized

नगरपालिके समोर सुरु असलेल्या उपोषणाला ठेक्यावरील घंटागाडी कामगारांचा पाठिंबा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेच्या कथित मनमानी, भ्रष्टाचार व गलथान कारभारा विरोधात मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी १३ जुलैपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला नगरपरिषदेतील घंटागाडी (घनकचरा संकलन) ठेक्या वरील कामगारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी ठेक्या वरील कामगारांनी आंदोलनात सहभागी होत आजपासून काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

महिबूब सय्यद यांनी उपोषणाद्वारे नगरपरिषदेतील विविध नागरी प्रश्नांसह कथित भ्रष्टाचार, विकासकामांतील अनियमितता, खड्ड्यातील प्लास्टिक, पुठ्ठे, रिकाम्या बाटल्या व फाटके कपडे यांची निविदेशिवाय विल्हेवाट लावल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करणे, सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेअंतर्गत तात्काळ घरे उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड वसूल करणे, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे तसेच शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे आदी मागण्यांसह नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे, प्रशासनातील मनमानी कारभार तसेच सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

        दरम्यान, ठेक्या वरील घंटागाडी कामगारांनीही आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी सय्यद यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करावे, पूर्वीचे थकीत वेतनही त्याच निकषांनुसार अदा करावे, दर महिन्याचे वेतन १५ तारखेपर्यंत नियमित मिळावे तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.

कामगारांचे म्हणणे आहे की, सध्या त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही. मिळणारे वेतनही वेळेवर दिले जात नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे कोणत्याही कामगारावर कारवाई करू नये किंवा त्यांना कामावरून कमी करू नये, अशीही मागणी कामगारांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 मुख्याधिकारी आणि प्रशासन या सर्व मागण्यांबाबत काय भूमिका घेतात, तसेच उपोषणावर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

 शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

 दरम्यान मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले की ठेक्या वर काम करणारा घंटागाडीवरील कामगार यांनी काम बंद आंदोलन केले असले तरी त्याच्या शहराच्या दैनदिन कचरा संकलन वर परिणाम झालेला नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button