विशेष
ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात श्रीक्षेत्र थापलिंग पायी दिंडीचे शिरूरमध्ये जल्लोषात स्वागत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24:} “ज्ञानोबा माउली तुकाराम”च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि भक्तिमय वातावरणात वळती (ता. आंबेगाव) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्रीक्षेत्र थापलिंग पायी दिंडी सोहळ्याचे शिरूर शहरात भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यंदा या दिंडी सोहळ्याचे तेरावे वर्ष असून, वळती येथून निघालेली दिंडी रामलिंगमार्गे शिरूर शहरात दाखल झाली. गोलेगाव रोड येथे माजी केंद्रप्रमुख बबनराव थोपटे, शिक्षक नेते संतोष थोपटे आणि प्रा. किशोर थोपटे यांच्या परिवाराच्या वतीने पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
यानंतर थोपटे यांच्या निवासस्थानी दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. वारकऱ्यांना मेंदूवडा-सांबार व शिरा असा नाश्ता प्रेमपूर्वक देण्यात आला. या सेवाभावी उपक्रमाबद्दल दिंडी सोहळ्याच्या वतीने संतोष थोपटे व प्रा. किशोर थोपटे यांचा सन्मान करण्यात आला.


