Uncategorized

लोकजागृती-चळवळ’च्या पुढील वाटचालीसाठी शिरूरमध्ये चिंतन बैठक

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: गेली चार दशके सामाजिक, शैक्षणिक आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या ‘लोकजागृती-चळवळ’ या संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत विचारमंथन करण्यासाठी गुरुवार (दि. १६) रोजी शिरूर येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी ५.३० वाजता यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील डंबेनाला येथील पोपट ओस्तवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

सन १९८४ मध्ये सुरू झालेली ‘लोकजागृती-चळवळ’ यंदा ४० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. या कालावधीत प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे ध्वजवंदन, ९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, शिवजयंती व्याख्यानमाला, लोकशाही संकल्प शिबिरे आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. या चळवळीच्या माध्यमातून पुढे लोकशाही क्रांती आघाडी, जीवन विकास मंदिर शाळा, औद्योगिक संस्था आणि ग्रंथालय यांसारखे विविध सामाजिक उपक्रमही उभे राहिले.

वेळोवेळी घेतलेल्या ठाम आणि तत्त्वनिष्ठ भूमिकांमुळे या चळवळीने शिरूरमध्ये मैत्रीभाव जपणारे, सामाजिक प्रश्नांवर हस्तक्षेप करणारे, सत्य व न्यायाच्या बाजूने उभे राहणारे आणि वैरभावापासून दूर राहणारे संघटन म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, चळवळीचे मार्गदर्शक ॲड. ओमप्रकाश सतीजा यांच्या अकस्मात निधनानंतर गेल्या काही महिन्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये शोक आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची पुढील दिशा, भूमिका आणि आगामी उपक्रम याबाबत सखोल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे.

या बैठकीला संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रवींद्र धनक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button