आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आनंद नागरी पतसंस्थेच्या संचालकांचा जामीन पुन्हा फेटाळला
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}. — शिरूर येथील आनंद नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित मधील कथित 16.70 रु.कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व संचालकांचे नियमित जामीन अर्ज शिरूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत.
आर्थिक गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, 1,500 हून अधिक ठेवीदारांचे कथित नुकसान आणि मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची बाब लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याची माहिती आनंद नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी दिली.
जैन यांनी सांगितले की सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. विजय फरगडे यांनी जामिनास तीव्र विरोध करत, संचालकांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कर्जव्यवहार झाल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींना जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांमध्ये फेरफार करणे तसेच तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. 
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात आरोपपत्रातील कागदपत्रांच्या आधारे संचालकांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसा पुरावा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले. 
ठेवीदारांच्या वतीने ॲड. आकांक्षा रामदास सरड यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यांना ॲड. जितेंद्र बूलगुंडे, ॲड. सोमेश कुलकर्णी आणि ॲड. शुभम गमे यांनी सहकार्य केले. हजारो ठेवीदारांची आयुष्यभराची बचत अडकलेली असून आरोपींना जामीन दिल्यास न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
ठेवीदार मुळचंद जैन, सुभाष फकीरचंद जैन, संगीता सरड, रामभाऊ सरोदे, यांच्यासह इतर ठेवीदारांनीही जामिनाला विरोध दर्शविला. 
न्यायालयाने आरोपपत्रातील कागदपत्रे, कर्जमंजुरीचे ठराव आणि अन्य पुरावे पाहता संचालकांविरुद्ध प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे पुरावे असल्याचे नमूद केले. आर्थिक गुन्ह्याचे गांभीर्य, मोठ्या प्रमाणावरील ठेवीदारांचे नुकसान
आणि मुख्य आरोपी फरार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व अटक संचालकांचे नियमित जामीन अर्ज पुन्हा फेटाळून लावण्यात आले असल्याचे जैन यांनी सांगितले.