Uncategorized

मन जिंकल्यास यश निश्चित; भीतीवर मात करण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार आवश्यक – डॉ. दत्तात्रेय कोहिनकर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}”यश आणि अपयश यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भीती. भीतीवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार, नियमित ध्यानधारणा आणि आत्मविश्वासाची जोपासना आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व समुपदेशक डॉ. दत्तात्रेय कोहिनकर यांनी केले.

शिरूर येथील सनशाईन सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित ‘मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे, , डॉ. राजेराम घावटे, सुनील घावटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

व्याख्यानात डॉ. कोहिनकर यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव आणि नैराश्याच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली. आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून प्रत्येकाने स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मन स्थिर राहते, तर सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवून यशाचा मार्ग मोकळा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रोध, मत्सर आणि द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांमुळे नैराश्य वाढते. “जसे विचार कराल तसे घडाल. जशी दृष्टी तशी सृष्टी,” असे सांगत त्यांनी प्रत्येकाने दररोज ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. “हजार युद्धे जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक वेळा भीती वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तितक्या भयावह नसतात. त्यामुळे भीती झटकून आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश निश्चित मिळते,” असेही ते म्हणाले.

पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करून त्यांच्या करिअर नियोजनासाठी ‘व्हिजन बोर्ड’ तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे. चांगले विचार आणि चांगली कर्मेच कठीण काळात माणसाला आधार देतात, असा संदेशही त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. सुनील घावटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी, तर आभार प्रदर्शन अमृतेश्वरी घावटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button