Uncategorizedराष्ट्रीयलेखविशेष

लोकनेते’ या शब्दाला अर्थ देणारे लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे, सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी नाते जोडणाऱ्या नेतृत्वाची चौथ्या स्मृतिदिनी आठवण.

‘लोकनेते’ या शब्दाला अर्थ देणारे बाबुराव पाचर्णे
सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी नाते जोडणाऱ्या नेतृत्वाची चौथ्या स्मृतिदिनी आठवण
आठवावी किती रूपे तुमची,
अन सांगावी किती कीर्ती दातृत्वाची…
सांगू किती कार्याचा आवाका तुमच्या,
कार्या पुढे तुमच्या शब्द माझे बापुडे…
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पाच दशकांहून अधिक काळ आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप उमटविणारे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणूस आणि कार्यकर्त्याच्या सुख-दुःखाशी नाते जोडणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे. त्यांच्या चौथ्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेताना जाणवते की, पाचर्णे हे केवळ राजकीय नेते नव्हते; ते अनेकांसाठी ‘आपला माणूस’ होते.
संघर्षाला घाबरले नाहीत
राजकारणात यशापेक्षा अपयशाचे क्षण अधिक आले, तरी त्यातून खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहण्याची प्रेरणा देणारे नेतृत्व म्हणून पाचर्णे यांची ओळख होती. संघर्ष जणू त्यांच्या पाचवीलाच पुजला होता. मात्र संघर्ष करताना त्यांनी कोणाशी कटुता निर्माण होऊ दिली नाही. राजकीय मतभेद एका बाजूला आणि वैयक्तिक मैत्री दुसऱ्या बाजूला, हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपले.
त्यामुळेच विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांशीही वैयक्तिक संबंध जपण्याची त्यांची हातोटी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळेपणा अधोरेखित करणारी होती.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी ‘मी आहे’चा दिलासा
पाचर्णे साहेबांच्या भोवती सदैव कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. कार्यकर्त्यांशी गप्पा मारणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, चहा-नाश्त्यापासून जेवणापर्यंत त्यांची आस्थेने विचारपूस करणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता.
हुरडा पार्टी असो किंवा त्यांच्या कृषी पर्यटनस्थळी आयोजित आमरसाचे जेवण; ‘साहेबांनी बोलावले आहे’ म्हणजे मनापासून आदरातिथ्य होणार, अशीच कार्यकर्त्यांची भावना होती. त्यांचे घर आणि कार्यालय हे अनेकांसाठी आपलेपणाचे ठिकाण होते.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या कार्यकर्त्यांना ते धीर देत. ‘निवडणुकीत हार-जीत असते. आज नाही तर उद्याचा दिवस आपलाच आहे,’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण करत. त्यांच्या एका शब्दाने आणि पाठीवरच्या आश्वासक हाताने कार्यकर्त्याला पुन्हा लढण्याचे बळ मिळत असे.
पराभवानेही न मोडलेली जिद्द
सन १९९५ मध्ये अवघ्या ६७८ मतांनी पराभव झाल्यानंतरही त्यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनातील सक्रियता सोडली नाही. पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी एका कार्यकर्त्याच्या घरातील दशक्रिया विधीस उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्याशी असलेले नाते अधिक घट्ट असल्याचे दाखवून दिले.
सन २०२२ मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रकृती अस्वास्थ्य असतानाही ते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. संघर्षापासून दूर पळणे हा त्यांच्या स्वभाव नव्हता.
सहा विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या. त्यापैकी चार वेळा पराभव स्वीकारावा लागला, तर दोन वेळा त्यांनी विजय मिळवला. मात्र विजयापेक्षा लढण्याची वृत्ती आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची जिद्द हीच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी ओळख ठरली.
‘वन मॅन आर्मी’
तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी असतानाही पाचर्णे यांनी आपल्या विचारांशी आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याच्या जोरावर राजकीय संघर्ष सुरू ठेवला. त्यांची स्वतःची एक मतदारसंघा स्वतंत्र मतपेढी होती. ही मतपेढी त्यांच्या विचारांशी शेवटपर्यंत ठाम राहिली.
विशेष म्हणजे, ‘कोणी आपल्यासाठी काय केले?’ याचा हिशेब ठेवण्याची त्यांची वृत्ती नव्हती. कोणी मदत केली अथवा नाही केली, तरी समोर आलेल्या गरजू व्यक्तीला मदतीचा हात देण्याची त्यांची तयारी कायम असे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातील सुख-दुःखाचा प्रसंग—पाचर्णे साहेब शक्य ती मदत करत; मात्र त्याचा गाजावाजा कधी करत नसत.
सत्तेपेक्षा जनसेवा महत्त्वाची
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक आणि आमदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. आमदार म्हणून काम करताना रस्ते, पायाभूत सुविधा आणि मतदारसंघातील विविध विकासकामांना त्यांनी चालना दिली.
प्रशासनावरची पकड, विविध राजकीय नेत्यांशी असलेले सौहार्दाचे संबंध आणि काम पूर्ण करण्याची धडपड यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली. सत्ता असताना ते हुरळून गेले नाहीत आणि सत्ता नसताना जनसेवेपासून दूर गेले नाहीत, हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते.
पक्षांच्या पलीकडचे मैत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विलासराव देशमुख अशा विविध पक्षांतील असंख्य नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.
पाचर्णे यांच्या आजारपणात विविध पक्षांचे नेते, मंत्री आणि कार्यकर्ते शिरूर येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन प्रकृतीची विचारपूस करीत होते. निधनानंतर अजितदादा पवार यांनी पाचर्णे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोकसंदेश पाठविला.
आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सर्वपक्षीय नेत्यांपर्यंत अनेकांची रांग लागली होती. ‘साहेब बरे व्हावेत… हा माणूस जगला पाहिजे…’ या भावनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्या अश्रूंमध्ये पाचर्णे यांनी आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचे खरे मोल दिसत होते—ही संपत्ती पैसा, पद किंवा सत्ता नव्हती; ती होती माणसे.
अनेक नात्यांत सामावलेले व्यक्तिमत्त्व
पाचर्णे साहेब हे कुणासाठी नेता होते, कुणासाठी मार्गदर्शक, कुणासाठी संघटक, कुणासाठी मित्र, कुणासाठी भाऊ, तर अनेकांसाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती.
म्हणूनच त्यांच्या निधनानंतर केवळ पाचर्णे परिवारानेच नव्हे, तर शिरूरच्या असंख्य नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘आपल्या घरातील ज्येष्ठ माणूस हरपला’, अशी भावना व्यक्त केली.
आजही जाणवते अनुपस्थिती
आगामी काळात अनेक निवडणुका होतील. राजकीय रणांगणात अनेक चेहरे असतील. मात्र पाचर्णे साहेबांचा आश्वासक, हसरा चेहरा दिसणार नाही. यापुढे विधानसभा निवडणुकीच्या राजकीय रिंगणात बाबुराव पाचर्णे नावाचे वादळ नसेल.
बाबुरावनगर येथील रेस्ट हाऊसवर गेल्यावर गोड हसत स्वागत करणारे, हक्काने चहापान करणारे आणि सुख-दुःखाच्या प्रसंगी वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आता नाही, ही जाणीव आजही अनेकांना अस्वस्थ करते.
माणूस देहरूपाने निघून जातो; पण त्याचे विचार, त्याने उभी केलेली माणसे आणि त्याने दिलेली दिशा कायम राहते. ‘संकटाला घाबरू नका, पराभवाच्या भीतीने लढणे सोडू नका, आपल्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष करा आणि सत्ता असो वा नसो, सामान्य माणसाच्या अश्रूंना पुसण्यासाठी सदैव तत्पर राहा,’ हा पाचर्णे साहेबांचा जीवनविचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
आठवणींच्या रूपाने सदैव सोबत…
लोकनेते, तुम्ही झिजलात शिरूरच्या जनाजनांसाठी,
आठवण येते तुमची क्षणाक्षणाला…
कार्याचा ठेवा तुमचा सदैव आमच्यापाशी,
दुःखाच्या सागरात लोटून आम्हाला
तुम्ही गेलात स्वर्गलोकी…
विश्वासात बसत नाही अजूनही,
साहेब, तुम्ही नसल्याचा…
तुमच्या स्मृतींना वाहतो
चतुर्थ स्मृतिदिनी अश्रुपूर्ण नयनांनी
भावपूर्ण आदरांजली…

प्रा. सतीश पांडुरंग धुमाळ

लोकनेते बाबुराव पाचर्णे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त मंगळवारी (११ ऑगस्ट) रोजी ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानगावकर (विश्वशांती केंद्र आळंदी देवाची) यांचे कीर्तन शिवतारा कृषी पर्यटन, तर्डोबाची वाडी , ता. शिरूर, जि. पुणे येथे सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे.
स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या सामाजिक, राजकीय आणि लोकसेवेच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
“काळाच्या ओघात वर्षे कितीही सरली, तरी तुमची आठवण मनातून कधीच नाही विरली. प्रेम, माया आणि संस्कारांची ठेव देऊन गेलात; आमच्या हृदयात सदैव जिवंत राहिलात,” अशा भावपूर्ण शब्दांत स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतींना आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे.
या पुण्यस्मरण कार्यक्रमास नागरिक, कार्यकर्ते आणि पाचर्णे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button