विशेष

बालवाडीच्या आवारात लिंबू, नारळ, अन् नैवेद्य; कथित करणीच्या प्रकाराने खळबळ

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} शिरूर नगरपरिषदेच्या प्रगती बालमंदिर/बालवाडीच्या परिसरात झाडाखाली लिंबू, नारळ, हळदी-कुंकू, ओटी भरण्याचे साहित्य, नैवेद्य आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार अंधश्रद्धा, भानामती अथवा करणीसदृश असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिरूर च्या वतीने करण्यात आली आहे.

      शिरूर शहरातील मारुती आळी येथे शिरूर नगरपरिषदेची प्रगती बालमंदिर/बालवाडीची इमारत आहे. या ठिकाणी ४० हून अधिक विद्यार्थी अंगणवाडीत आहेत. सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी बालवाडीच्या परिसरातील एका झाडाखाली संशयास्पद वस्तू आढळून आल्या. नारळ, लिंबू, हळदी-कुंकू, ओटी भरण्याचे साहित्य, नैवेद्य आढळल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, बालवाडीच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य होते. इमारत नादुरुस्त असून दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या परिसरात विषारी सापही आढळत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अंधश्रद्धेच्या प्रकाराबरोबरच बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गदिया, सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती आयेशा सय्यद, सभापती सुनील जाधव, सभापती ऐजाज बागवान, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. क्रांती पैठणकर, डॉ. वैशाली साखरे, योगेश जामदार, बंटी जोगदंड आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलीस निरीक्षक विनोदकुमार पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून, या प्रकारामागे नेमके कोण आहे, याचा तपास करण्याच्या दृष्टीने माहिती घेण्यात येईल असे सांगितले.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी बालवाडीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल, तसेच आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे सांगितले

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. वैशाली साखरे व प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी या प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. हा प्रकार नेमका कोणी केला, त्यामागील उद्देश काय होता आणि बालवाडीच्या परिसरात प्रवेश करून हा प्रकार कसा करण्यात आला, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांºनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button