Uncategorized

दृष्टीदानाचे कार्य अखंड सुरू ठेवा; डॉ. भालेकर दाम्पत्याचे कौतुक

पुण्यातील EYON Eye & Laser Instituteच्या शुभारंभप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: पुण्यातील खराडी येथे डॉ. स्वप्नील भालेकर व डॉ. सोनल भालेकर यांच्या EYON Eye & Laser Instituteचा शुभारंभ उत्साहात झाला.

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भालेकर दाम्पत्याच्या नेत्रसेवेचे कौतुक करत, “५० हजार लोकांवर नेत्रशस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून देणे ही साधी गोष्ट नाही. हे दृष्टीदानाचे काम अखंड सुरू ठेवा,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे, वडगाव-शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार विजयराव औटी, माजी आमदार अशोकबापू पवार, महानगर बँकेच्या प्रमुख गीतांजली शेळके, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धरिवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुण्याच्या बदललेल्या स्वरूपाचा संदर्भ देताना पवार म्हणाले की, पूर्वीची खराडी आणि आजची खराडी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.” आयटी क्षेत्र, उद्योग, व्यावसायिक आणि गुंतवणुकीमुळे खराडी, हिंजवडी, मगरपट्टा यांसारख्या भागांनी पुण्याच्या विकासाला नवी दिशा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

हिंजवडी येथे आयटी क्षेत्र विकसित करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची आठवण सांगताना पवार यांनी त्या काळातील प्रसंग कथन केला. हिंजवडी येथे साखर कारखाना उभारण्याऐवजी तेथे आयटी उद्योग उभारण्याची गरज असल्याचे आपण त्यावेळी स्पष्ट केले होते. पुढे हिंजवडी देशातील महत्त्वाचे आयटी केंद्र बनले, असे त्यांनी सांगितले.

“आज पुण्यात आयटी क्षेत्रात तीन लाखांहून अधिक तंत्रज्ञ काम करतात. पुण्यातून निर्यात होणाऱ्या आयटी उत्पादनांची उलाढाल सुमारे ११ हजार कोटी रुपयांची आहे,” असेही पवार यांनी सांगितले. आर्थिक विकासाबरोबरच पुण्याने वैद्यकीय क्षेत्रातही देशात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. स्वप्नील व डॉ. सोनल भालेकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना पवार म्हणाले की, पारनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करत अनेक कुटुंबांनी कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. त्याच परंपरेतील डॉ. भालेकर दाम्पत्याने अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक मशिनरी  यामुळे येथे उत्तम दर्जाची नेत्रसेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती येथे पूर्वी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांच्या आठवणीही पवार यांनी सांगितल्या. “दृष्टी नसलेल्या व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी डोळ्यावरील पट्टी काढली आणि त्याला दिसू लागले की, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हा आमच्यासाठी मोठा समाधानाचा क्षण असायचा,” असे त्यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना माफक दरात नेत्रसेवा उपलब्ध करून देणाऱ्या भालेकर दाम्पत्याचे अभिनंदन करताना पवार म्हणाले, “५० हजार लोकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून देणे ही मोठी कामगिरी आहे. या ५० हजार लोकांचे जीवन बदलले आहे. त्याचे पुण्य डॉ. स्वप्नील व डॉ. सोनल भालेकर यांना निश्चितच लाभेल.”

“अनेकांना दृष्टी नसल्याने त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली अस्वस्थता शस्त्रक्रियेमुळे दूर होते. त्यांना दृष्टी मिळते आणि जीवन बदलते. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेले दृष्टीदानाचे काम अखंड सुरू ठेवा,” असे आवाहन पवार यांनी  केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्निल भालेकर यांनी केले तर स्वागत डॉ.सोनल भालेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button