थकित मालमत्ता व पाणी कर थकबाकी पोटी ६८ नळ कनेक्शन खंडित तर एक गाळा सील बंद .
शिरुर नगरपरिषदेची कारवाई
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणी कराच्या थकबाकी पोटी आज अखेर पर्यत ६८ नळ कनेक्शन खंडित व गाळा सीलबंद करण्याची कारवाई केली आहे . यापुढे ही थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्तेच्या जप्तीची व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू ठेवली जाणार असल्यामुळे कराचा भरणा करून जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे .
पाटील यांनी सांगितले की नगरपरिषद चा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर दरवर्षी ०१ एप्रिल रोजी देय होतो तसेच पहिल्या सहामाही पूर्वी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणे अनिवार्य आहे अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये थकीत रकमेवर दरमहा २ % शास्ती आकारण्यात येते .
शिरुर शहरातील सर्व मिळकत धारकांना आत्ता पर्यन्त भ्रमणध्वनी वर 4 वेळेस कर भरणा करणे बाबत संदेश पाठवण्यात आलेले आहे . मालमत्ता कराचा भरणा न झाल्यास २ % शास्ती बसविली जाईल ही माहिती शिरुर शहरात नगरपरिषद च्या १० घंटा गाडी द्वारे दवंडी स्वरुपात देण्यात आली
आहे.
नागरिकांच्या सोईसाठी कर भरणेकामी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार देखील नगपरिषद नवीन प्रशासकीय इमारत येथील नागरी सुविधा केंद्र व तसेच जुनी नगरपरिषद येथेही अतिरिक्त वसूली केंद्र कार्यान्वित केलेले आहे. तसेच नागरिकांना घर बसल्या “Shirurnp.org” या संकेत स्थळांवर भेट देऊन करांचा भरणा करण्याची सुविधा परिषदे मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचे पाटील यांनी सांगितले .
शिरूर नगरपरिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत २५ मार्च २०२५ ला नगरपरिषदेचा भाजी बाजार मटन मार्केट मधील १ गाळा थकीत मालमत्ता करापोटी सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली
यावेळी पालिकेचे आधिकारी अक्षय बनगीनवार, दीपक कोल्हे, मोहन गुरव, तेजस शिंदे, अमृत भवर, आदी भगवान आगोणे आदी कर्मचारी उपस्थित होते.