Uncategorized

शिरूरमध्ये नागरी समस्यांवर ‘घंटानाद’ सत्याग्रही आंदोलन

प्रलंबित कामे, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते व वीज समस्यांबाबत आक्रोश

शिरूर { डेली न्यूज पोस्ट -टीम 24}
शहरातील प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी “घंटानाद सत्याग्रही आंदोलन” हे आंदोलन गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत दत्त मंदिर, हूडको वसाहत, शिरूर येथे करण्यात येणार आहे.
माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, शहरातील नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. शिरुर मधील शांतीनगर, सिध्दार्थनगर, इंदीरानगर, कोर्टाजवळील वसाहत आणि यशवंत वसाहतीजवळील पाण्याच्या टाकी येथील भटक्या विमुक्त समाजाच्या वसाहतीमध्ये गेल्या ४० वर्षा पेक्षा जास्त दिवस राहणाऱ्या बेघर आणि भूमिहीन कुटूंबाचे आहे त्याच जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आदर्श पुनर्वसन प्रकल्पानुसार पुनर्वसन करावे, आणि अशा उपाययोजनांचा आराखडा होईपर्यंत या वस्त्यांवर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याला स्थगिती दयावी, तसेच या ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता पुरेशा संडास बाथरुमची व्यवस्था करावी.शिरुर गावातुन बाबुरावनगर कडे जाणा-या (सी.टी. बोरा कॉलेज रोड), डी. पी. रोडवरील सर्व प्रकारचे अडथळे जसे की विजेचे खांब व डि. पी. स्ट्रक्चर, पुणे-नगर बायपास करीता केलेल्या भरावाची संरक्षक भिंत आणि इतर अतिक्रमणे काढून हा रस्ता पादचारी आणि वाहतुकीकरीता पुरेसा रुंद आणि सोयीचा करावा, येथील भुयारी मार्गाजवळील चेंबरवरील झाकणे योग्य त्या इंजिनिअरींग डिझाईननुसार बसवावीत. शिरुर ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही त्वरित करावी, आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये महिलांच्या प्रसुतीकरीता पूर्णवेळ प्रसूती तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून आणि येथे स्वतंत्र आणि आधुनिक प्रसुती कक्ष उभारण्यात यावा. हुडको वसाहतीला गेली २५ वर्षापासून दररोज पहाटे ४.०० वा. पिण्याचे पाणी येते, त्याची वेळ महिलांच्या सोयीची व्हावी याकरीता हुडको वसाहतीकरीता एक स्वतंत्र पाण्याची टाकी करावी व नागरिकांच्या सोयीच्या वेळी पाणी पुरवठा करण्यात यावा. हुडको वसाहतीजवळील सर्वे नंबर ११४० मधील १ हेक्टर सरकारी जागेला तातडीने कुंपन घालावे, येथील रिकाम्या मैदानाचा वापर परिसरांतील मुले, शाळेतील मुले खेळाचे मैदान म्हणून वापर करीत आहेत, या जागेच्या मागील बाजूस रात्री अपरात्री अनेक वेळा असामाजिक तत्वे तथा गुन्हेगारांकडून या जागेचा गैरवापर होतो आहे, या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढून नगरपालिकेने त्वरीत कुंपन घालावे. सदरच्या जागेवरील दत्तमंदिराची इमारत सुमारे ३५ वर्षांपूर्वीची असून तिची देखभाल दुरुस्ती करण्याची परवानगी दयावी आणि त्या ठिकाणी पाण्याचे कनेक्शन आणि मैदानाच्या जागेवर विद्यार्थ्यांच्या वापराकरीता पोर्टेबल (तात्पुरते) संडास बाथरूम उभारण्याची परवानगी देण्यात यावी.
वरील पाचही मागण्यांकरीता गेली अनेक वर्षापासून संबंधित सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना वेळोवेळी भेटून निवेदने दिली आहेत, त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा सत्याग्रही आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असल्याचे धनक यांनी सांगितले.
या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास सत्याग्रही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे आवाज पोहोचवण्याचा आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे माजी नगरसेवक रवींद्र धनक यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना शांततामय पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button