विशेषशैक्षणिक

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांसाठी विशेष व्याख्यानमाला

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम _२४) :
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन  करण्यात आले होते . या व्याख्यानमालेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते. उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव यांनी इतिहास विषयाशी निगडित अभ्यासाच्या पद्धती, नियोजन व स्पर्धा परीक्षांमधील उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानोबा चाटे, तसेच मान्यवर प्राध्यापक मंचावर उपस्थित होते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन :
डॉ. श्रीपाद जोशी यांनी इंग्रजी विषयाची तयारी व दैनंदिन जीवनातील उपयुक्तता स्पष्ट केली.
डॉ. स्वप्निल काळे यांनी गणितातील तांत्रिक बाबी व सोप्या पद्धतींचा परिचय करून दिला.
प्रा. अशोक चौधरी यांनी विज्ञान विषय व विशेषतः वनसेवा परीक्षेतील संधींचे विश्लेषण केले.
प्रा. ए. एम. खैरे यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि मानसिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले.
या व्याख्यानमालेत अभ्यासाचे नियोजन, प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि मुलाखतीसाठी मानसिक तयारी यावर भर देण्यात आला. महाविद्यालयातील विविध शाखांतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना दिशा आणि प्रेरणा मिळते,” असे प्रतिपादन प्रा. जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानोबा चाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ए. एम. खैरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button