
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 ) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अंतर्गत शिरूर तालुक्यात शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील एकूण ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार असून, यामध्ये ३ लाख १ हजार ७८६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत एकूण ३३७ मतदान केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३७१ मतदान केंद्राध्यक्ष, १,११३ मतदान अधिकारी, ३७१ शिपाई, तसेच ३७१ पोलीस शिपाई व आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास बंदी असून, सर्व मतदारांनी या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रिया सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव येथील गोदाम क्रमांक ३ येथे २८ टेबलांवर निवडणूक विभागनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक निवडणूक विभागासाठी दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करून त्यानंतर पुढील विभागाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखून, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत शांततेत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले आहे.






