राजकीय

तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारांमुळे शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 } तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. प्रस्थापितांना धक्के देत नवीन उमेदवार निवडून येऊन इतिहास घडवणार की पुन्हा प्रस्थापितच यशस्वी होणार याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे भाजपाच्या वतीने शिरूर ग्रामीण गटातून जिल्हा परिषदे करता निवडणूक लढवीत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळत नसल्याचे संकेत मिळाल्याबरोबर माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची निवडणूक शिरूर तालुक्यात लढवत आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या आहेत.

 शिरूर मध्ये जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस या सात पैकी सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व एका ठिकाणी लोकशाही क्रांती आघाडी चा उमेदवार निवडून आला होता. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे भारतीय जनता पक्षाने कडवे आव्हान उभे केले असून तालुक्यातील दिग्गजांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने यंदा जिल्हा परिषद निवडणूकीला तगडे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे आहे.

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार की भाजपा याविषयी उत्सुकता आहे.

 तालुक्यात टाकळी हाजी जिल्हा परिषद गटामधील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. मागील सहा दशकाहून अधिक काळ शिरूरच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवणारे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दामू अण्णा घोडे व शिवसेना ठाकरे पक्षाचे बाळासाहेब डांगे, शिवसेना शिंदे पक्षाचे सुभाष पोकळे व भाजपाचे राजेंद्र पोपटराव गावडे अशी चौरंगी लढत होत आहे. राजेंद्र गावडे राष्ट्रवादी काँग्रेस {अजित पवार} कडून प्रबळ इच्छुक होते. त्यानुसार त्यांनी प्रचारही सुरू केला होता. परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन उदयास आलेल्या राजकीय समीकरणात माजी सरपंच दामू अण्णा घोडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. मागील काही वर्षापासून घोडे यांनीही उमेदवारी करता मोठी तयारी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ही त्यांनी यश मिळवले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही प्रबळ मानली जात आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पोकळे हे शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मैदानात आहेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाळासाहेब डांगे मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

मागील सहा दशकाहून अधिक काळ टाकळी हाजी गट हा माजी पोपटराव गावडे यांचा गड मानला जातो. राजेंद्र गावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावल्यानंतर त्यांनी थेट भाजपची उमेदवारी घेतली.

सचिन कोठारी यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 व विद्याधाम प्रशाला सन १९९३ दहावीच्या बॅचच्या वतीने भावपूर्ण आदरांजली

 भाजपाकडून मैदानात उतरलेल्या राजेंद्र गावडे यांच्याबरोबर माजी आमदार पोपटराव गावडे यांची ही प्रतिष्ठा या गटात पणाला लागली आहे.

 शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून दिवंगत भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती ताई पाचर्णे या भाजपाच्या वतीने मैदानात आहेत तर त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली बबन वाळके या उमेदवार आहेत. माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या निधनानंतर होत असलेल्या निवडणुकीत माजी आमदार बाबुराव पाचरणे यांच्या विषयीची सहानभूती मालतीताई पाचर्णे यांना विजयी करणार का याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे याची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वृषाली वाळके यांनी ही जोरदार प्रचार यंत्रणा उभी करत निवडणुकीत आव्हान उभे केले आहे.

मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात सुजाता अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) मच्छिंद्र गदादे ( शिवसेना ठाकरे ), सचिन शेलार ( भाजप ), दादासाहेब फराटे ( स्वाभिमानी विकास आघाडी )

 अशी चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभ्या असणाऱ्या सुजाता अशोक पवार या माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी असून जिल्हा परिषदेमध्ये माजी सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमी वर जिल्हा परिषद निवडणुकीत सुजाता पवार यांना निवडून आणून राजकारणात जोरदार कमबॅक करण्याच्या दृष्टीने माजी आमदार अशोक पवार यांनी डावपेच आखले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुजाता पवार यांच्या विरोधात वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार भाजपाच्या वतीने मैदानात उतरले आहेत. तर पवार यांचे पारंपारिक विरोधक घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे हे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून उभे आहेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गदादे मैदानात उतरले आहे. साहजिकच या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.

तळेगाव – रांजणगाव सांड्स जिल्हा परिषद गटातून रेखा मंगलदास बांदल ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सारिका करपे (शिवसेना शिंदे ) दीपाली गव्हाणे ( भाजप ) रेश्मा जयेश शिंदे ( अपक्ष )अशी चौरंगी लढत होत आहे. रेखा बांदल या माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी असून मागील टर्म मध्ये जिल्हा परिषद सदस्या होत्या. यंदा त्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून मैदानात आहे. तर शिंदे शिवसेनेच्या वतीने सारिका करपे मैदानात आहे. भाजपच्या वतीने दीपाली गव्हाणे निवडणूक लढवत असून भाजपाचे नेते जयेश शिंदे यांच्या पत्नी रेश्मा शिंदे या अपक्ष म्हणून मैदानातून उभ्या ठाकल्या आहेत. शिंदे यांच्या उमेदवारीमुळे इथल्या निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली आहे.

शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटातून मोनिका हरगुडे ( राष्ट्रवादी काँगेस ) व सीमा कळमकर ( अपक्ष ) यांच्यात थेट लढत होत आहे. या ठिकाणी भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कुसुम खैरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडणूक रिंगणा बाहेर गेला. तर मागील टर्मला जिल्हा परिषद सदस्य असलेल्या कुसुमताई मांढरे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार मोनिका हरगुडे अपक्ष उमेदवार सीमा कळमकर अशी लढत होत आहे.हरगुडे यांनी पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून काम केलेले आहे. या गटातून भाजपच्या उमेदवाराने नेमकी का माघार घेतली याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटात प्रफुल्ल शिवले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) विकास गायकवाड ( भाजप ) यांच्यात थेट लढत होत आहे.

  रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून या गटातील लढत हाय व्होल्टेज होणार हे बोलले जात होते. जिल्हा परिषद निवडणुकी पूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर दादा पाचुंदकर त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती पाचुंदकर तयांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. मागील टर्म मध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या स्वाती पांचुदकर या भाजपाच्या वतीने मैदानात आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव चे तालुका अध्यक्ष मानसिंग भैय्या पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती पाचुंदकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा सधनपट्टा या जिल्हा परिषद गटात येत असून दोन्ही पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.

 कार्यकर्त्यांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेत्यांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी दिल्याने या निवडणुका कमाली चुरशीच्या बनल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मित मृत्यूनंतर होत असणारी ही निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकतर्फी यश मिळवणार ही भारतीय जनता पक्ष जोरदार कामगिरी करत जास्तीत जास्त जागा जिंकणार हे निवडणूक निकालानंतर कळेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button